दहावीचा निकाल वर्षभर केलेल्या परिश्रमाची परिश्रृती : महापौर दयाशंकर तिवारी
मनपा शाळांचा ९९.९३ टक्के निकाल : इंग्रजी माध्यमाची सानीया परीन मो.इम्तीयाज चारही माध्यमातून प्रथम
Date : 19 Jul 2021
शुक्रवारी (ता.१६) दहावीचा निकाल लागला. यामध्ये मनपाच्या शाळांचा ९९.९३ टक्के एवढा निकाल आहे. मनपाच्या जी.एम.बनातवाला मनपा इंग्रजी माध्यमिक शाळेची विद्यार्थीनी सानीया परीन मो. इम्तीयाज या विद्यार्थीनींने सर्वाधिक ९५.८० टक्के गुणांसह मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चारही माध्यमांमधून प्रथम आलेली आहे.
दहावीच्या निकालानंतर मनपा शाळांमध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मनपातर्फे सोमवारी (ता.१९) सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये महापौर दयाशंकर, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, समिती सदस्या संगिता गि-हे, डॉ. परिणिता फुके, सदस्य मो.इब्राहिम तौफीक अहमद, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, सुभाष उपासे, मुख्याध्यापक राजेन्द्र पुसेकर, धैर्यशील वाघमारे यांचेसह इतर शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कोरोना महामारीशी लढा देत असताना मनपाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुद्धा विपरीत परिस्थितीचा सामना केला आहे. कोव्हिड कार्यामध्ये कर्तव्य बजावत असतानाही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या शिक्षकांनी प्रयत्न केले. तर संसाधने उपलब्ध नसताना विपरीत परिस्थितीतून मार्ग काढीत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. विद्यार्थी व शिक्षकांच्या वर्षभरातील मेहनतीचे फलीत या निकालातून दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.
शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांच्या मार्गदर्शनात व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांच्या नेतृत्वात मनपाचे शिक्षण विभाग उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या उच्चांक वाढीच्या दृष्टीने खासगी क्लासेसच्या सहकार्याने प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा घेउन त्यातून १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना खासगी क्लासेसद्वारे शिक्षण देणा-या मनपाच्या प्रकल्पाचे यश लक्षात घेता यावर्षीही तो प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे ते क्लासेस बंद ठेवावे लागले. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त मनपा ‘सुपर ७५’ प्रकल्प सुरू करीत आहे. या प्रकल्पांतर्गत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेउन त्यांच्यामधून ७५ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यातून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार २५ विद्यार्थ्यांना 'जेईई', २५ विद्यार्थ्यांना 'नीट' आणि २५ विद्यार्थ्यांना 'एनडीए' च्या परीक्षेसाठी आवश्यक शिक्षण दिले जाणार आहे. शहरातील खासगी ट्युशन क्लासेसच्या सहकार्याने होणारे हे कार्य सुद्धा कोव्हिडमुळे विलंबिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर, इंजिनिअर या क्षेत्राकडेच न वळता त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये जाउन उत्तम प्रशासकीय कार्य करावे यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक तयारीसाठी मनपा ६ अभ्यासिका तयार करीत आहे. या सहा अभ्यासिकांचे संचालन यूपीएससी व एमपीएससी परीक्षांच्या बाबतीत कार्य करणा-या संस्थांना देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक अध्ययन सामुग्रीसह त्यांचे टेस्ट सिरीज, समुपदेश सुद्धा केले जाणार आहे. आपल्या मनपाच्या विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, त्यांचा शिक्षणासह सर्वांगिण विकास व्हावा यासाठी मनपा सर्व विद्यार्थ्यांच्या सदैव सोबत असल्याचा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रारंभी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी निकालाची संपूर्ण स्थिती प्रास्ताविकात विषद केली. यावर्षी नागपूर महानगरपालिकेच्या शाळांचा एकूण निकाल ९९.९३ टक्के एवढा लागला आहे. विशेष म्हणजे मनपाच्या २९ पैकी २८ शाळांचा निकाल हा १०० टक्के आहे. मनपाच्या १५०५ विद्यार्थ्यांपैकी १५०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी मनपाच्या शाळांचा निकाल ८५.२८ टक्के एवढा होता. कोरोना नंतरही मनपाच्या शाळांचा निकाल हा ९० टक्क्यांच्यावरच असावा, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आदी मान्यवरांनी सुद्धा यावेळी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर यांनी केले.संचालन सहाय्यक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी केले तर आभार राजेन्द्र सुके यांनी मानले.
प्राविण्यप्राप्त विद्यार्थी (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय)
मराठी माध्यम : सुहानी गोसावी भगत (९४.२० टक्के, डॉ.राममनोहर लोहिया मनपा मराठी माध्यमिक शाळा), सलोनी महादेव कांबळे (९३.६० टक्के, बॅ.शेषराव वानखेडे मराठी माध्यमिक शाळा), प्रीति शिवचरण गणवीर (९३.४० टक्के, शिवणगाव मनपा मराठी माध्यमिक शाळा)
हिंदी माध्यम : स्वाती विनोद मिश्रा (९०.६०टक्के), काजल रामनरेश शर्मा (८९ टक्के), रिझवाना खातुन खैरुद्दीन अन्सारी (८६.६० टक्के, तिघेही सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा)
उर्दू माध्यम : बुशरा फातीम अजीज खान (९२ टक्के, गंजीपेठ मनपा उर्दू माध्यमिक शाळा), झीक्रा फातीमा अन्वर जलील (९१.२० टक्के, एम.ए.के. आझाद मनपा उर्दू माध्यमिक शाळा), मसर्रत मो.वकील (९१.२० टक्के, साने गुरूजी उर्दू माध्यमिक शाळा), अदीबा अनीस अन्सारी रजा अनीस अन्सारी (९१ टक्के, एम.ए.के. आझाद मनपा उर्दू माध्यमिक शाळा)
इंग्रजी माध्यम : सानीया परीन मो. इम्तीयाज (९५.८० टक्के), लक्ष्मी अरुणकुमार चव्हाण (८३.२० टक्के), मोहम्मद हाशीर मो. फजील (८३.२० टक्के, तिघेही जी.एम.बनातवाला मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा)
दिव्यांग विद्यार्थी : शिवम सिरसलाल उरकुडे (८३ टक्के, डॉ.आंबेडकर मनपा मराठी माध्यमिक शाळा)
मागासवर्गीय विद्यार्थी : सलोनी महादेव कांबळे (९३.६० टक्के, बॅ.शेषराव वानखेडे मराठी माध्यमिक शाळा)