वंदे मातरम् हेल्थ पोस्टमध्ये आवश्यक सुविधांकरिता समन्वयाने कार्य करा : महापौर दयाशंकर तिवारी
लोककर्म, जलप्रदाय व विद्युत विभागाच्या अधिका-यांची घेतली आढावा बैठक
Date : 20 Jul 2021
वंदे मातरम् हेल्थ पोस्टमधील सुविधांच्या संदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी (ता.२०) तिनही विभागांची आढावा बैठक घेउन चर्चा केली. महापौर कक्षामध्ये झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) मनोज गणवीर, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, वाहतुक अभियंता श्रीकांत देशपांडे, आर्किटेक्ट त्रिलोक ठाकरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहरातील गर्दीच्या, दाट वस्तीच्या भागात व जिथे जवळपास प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध नसलेल्या भागांमध्ये स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध भागात ७५ ‘हेल्थ पोस्ट’ तयार करण्याची संकल्पना महापौर दयाशंकर तिवारी यांनी मांडली. त्याच संकल्पनेनुसार येथील कार्याबाबत महापौर स्वत: लक्ष घालून कार्य करीत आहेत. या अंतर्गत हेल्थ पोस्टमध्ये आवश्यक भौतिक सुविधांच्या संदर्भात त्यांनी मंगळवारी आढावा घेतला. या अंतर्गत हेल्थ पोस्टमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी प्रसाधनगृहांची निर्मिती तेथे पाण्याची व्यवस्था, नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था आणि सर्वत्र विद्युत प्रकाश व्यवस्था आदी उपलब्ध करण्याबाबत त्यांनी तिनही विभागांना निर्देशित केले.
यासंदर्भात कुठलिही अडचण येत असल्यास तात्काळ त्याची माहिती देउन ते सोडवून घेण्याबद्दलही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्य सुविधेच्या दृष्टीने सर्व हेल्थपोस्ट लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असून त्याबद्दल प्राधान्याने कार्य करण्याचेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी निर्देश दिले.