लिकेज ठीक करा, नळ कनेक्शन द्या..!
जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई यांचे निर्देश ; नगरसेवक, नागरिकांकडून जाणून घेतल्या समस्या
Date : 31 Jul 2021
शहरातील विविध भागांतील नगरसेवक आणि नागरिकांच्या पाणी पुरवठ्यासंदर्भात असलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता सत्यता जाणून घेण्यासाठी जलप्रदाय समितीचे सभापती संदीप गवई यांनी मंगळवारी (ता. २७) शहरातील विविध भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.कळमना परिसरात नगरसेवक शेषराव गोतमारे यांच्यासह त्यांनी कळमना टाकीच्या व नळाच्या नेटवर्कची पाहणी केली. अनेक ठिकाणी लिकेज असल्याचे त्यांना आढळून आले. पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असून अनेक वस्त्यांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. चार दिवसात नेटवर्कची तपासणी करून लिकेज काढण्यात यावे, असे निर्देश श्री. गवई यांनी अधिकाऱ्यांना दिले.
हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या चंदन नगर परिसराच्या दौऱ्यात नगरसेविका उषाताई पॅलट सोबत होत्या. येथे अनेक ठिकाणी अवैध नळ कनेक्शन असल्याचे त्यांना आढळून आले. यामुळे मनपाचे नुकसान होत असून नियमित पाणी बिल भरणाऱ्यांनाच यामुळे मुबलक पाणी मिळत नाही. अशा लोकांचे कनेक्शन नियमित करण्यात यावे. नव्याने नळ जोडणी देण्याची मोहीम सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
वाठोडा परिसरातील नागरिकांच्याही पाणी पुरावठ्यासंदर्भात अनेक तक्रारी होत्या. तेथील नागरिकांनी समस्या न सोडविल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. नगरसेविका समिता चकोले यांच्यासोबत सभापती संदीप गवई यांनी नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वाठोडा परिसरात पाणी टाकी त्वरित मंजूर करण्याचे आदेश दिले. यासोबतच शहरातील पाणीपुरावठ्यासंदर्भात असलेल्या सर्व तक्रारी १५ ऑगस्ट पर्यंत सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या दौऱ्यात त्यांच्यासोबत जलप्रदाय विभागाचे अधिकारी, संबंधित झोनचे अधिकारी, ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.