मनपा शाळांची पटसंख्या वाढीसाठी एकत्रितरित्या नियोजन व कृती करा : महापौर दयाशंकर तिवारी
मनपाचे सहा शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित
Date : 09 Sep 2021
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती सुमेधा देशपांडे, सदस्या परिणिता फुके, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर आणि पुरस्कारप्राप्त शिक्षक आपल्या परिवारासह उपस्थित होते.
समारोहात मनपाच्या सहा शिक्षकांना महापौरांसह मान्यवरांच्या हस्ते मनपाचा मानाचा दुपट्टा, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, तुळशीरोप आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये सुरेंद्रगढ हिंदी माध्यमिक शाळेच्या कल्पना सुरेश माळवे, वाठोडा मराठी उच्च प्राथमिक शाळेचे ईश्वर संतोष धुर्वे, सदर उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या शाहीन कौसर सैय्यद, बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन शाळेचे संदीप यशवंत अभ्यंकर, साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळेचे अब्दुल सलीम अब्दुल रहीम आणि ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळेचे काजी नुरुल लतीफ यांचा समावेश होता.
यासोबतच व्यवसायाने शिक्षक असलेले मनपाचे शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे व उपसभापती सुमेधा देशपांडे त्यांचाही याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून विशेष सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना महापौर म्हणाले, शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही. आपले संपूर्ण जीवन हे शिकण्यासाठीच असते. मात्र मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे झाले आहे. परंतु अशा महामारीत सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मनपाच्या शाळेतील शिक्षकांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. लॉकडाऊनच्या काळात मनपा शाळांच्या शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण, शक्य तिथे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचे अभिनव उपक्रम राबविले. तसेच कोविड काळात इतर जबाबदारीही पार पाडली, असेही ते म्हणाले.
मनपाच्या शाळांतील मुलांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मनपाच्या शाळेत राबविण्यात येणारे अभिनव उपक्रम, गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक यांच्या गुणगौरवाची माहिती विद्यार्थी, पालक आणि समाजात पोहोचावी यासाठी त्यासंदर्भात सर्व शाळांमध्ये बॅनर, होर्डिंग लावण्यात यावेत. सुरेन्द्रगड शाळेच्या विद्यार्थ्यीनी यांनी सर्वात लहान उपग्रह आकाशात सोडण्याचा विक्रम केला तर वाल्मिकीनगर शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेत व्दितीय क्रमांकावर होते. आपल्या शाळेची प्रतिमा आपल्याच बदलवायची आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे गरजेचे आहे. मनपा शाळेतील विद्यार्थी दहावी आणि बाराविच्या परिक्षेत मेरीट मध्ये आले. हे उदाहरण विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे याच्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. शाळेतील सकारात्मक विचार नागरिकांपर्यंत पोहचवा, अशा सूचनाही यावेळी महापौरांनी केल्या. तसेच पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि पुढेही शिक्षण विभाग असेच कार्य करीत राहील अशी आशा व्यक्त केली.
मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितले की, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. याच दिवशी दरवर्षी नागपूर महानगरपालिकेतर्फे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मनपाच्या शाळेतील शिक्षकांची निवड करून आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षी ६ अर्ज प्राप्त झाले आणि या सहाही शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचे समितीने ठरविले. कोरोना काळात मनपाच्या शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणात खंड न पडू देता अविरत कार्य केले तसेच कोरोना काळात मनपाने दिलेले कार्यही जबाबदारीने पार पाडले, अशा शब्दांत त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन मधू पराड यांनी तर आभार सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे यांनी मानले.