नागपुरातील पर्यावरणपूरक प्रकल्पांची अयोध्येच्या महापौर परिषदेत चर्चा
महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली माहिती; १११ वी महापौर परिषद
Date : 13 Sep 2021
यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी माहिती दिली. उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे दोन दिवसीय १११ व्या अखिल भारतीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, पंजाब, राजस्थान, केरळ, हरियाणा, बंगाल, तामीळनाडू, ओडिसा राज्यातील ७० महापौर सहभागी झाले आहेत. महापौर परिषदेचे उद्घाटन १२ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री आशुतोष टंडन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तर समारोप तर समारोप प्रदेश भाजपचे संगठन महामंत्री सुनील बंसल यांच्या उपस्थितीत होईल. अ.भा. राष्ट्रीय महापौर परिषदेचे अध्यक्ष आग्राचे महापौर नवीन जैन यांच्या नेतृत्वात सदर महापौर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाली. यात उपस्थित महापौरांनी सहभाग घेतला. ‘शहर विकासात आपले शहर’ या विषयावरील सत्रात महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहरातील विविध प्रकल्पांची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील अनेक अभिनव प्रकल्प नागपुरात साकारात आहेत. उद्यांनामध्ये छोटे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लावून ते पाणी उद्यान तसेच बांधकामाकरिता वापरण्यात येणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. देशातील पहिली ब्रॉड गेज मेट्रो नागपुरात धावणार आहे. देशातील पहिली इलेक्ट्रिक बस, पहिला ई-रिक्षा नागपुरात धावला. नागपुरात सीमेंट रस्त्यांचा प्रकल्प आदर्श ठरला आहे. संपूर्ण शहरात एलईडी पथदिवे लावून करोडो रुपयांची वीज वाचविली जात आहे. आता आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सोयी बळकट करण्यावर महानगरपालिका भर देत आहे. सवतंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मानपातर्फे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. शहरात ७५ वंदे मातरम हेल्थ पोस्ट सुरू करण्यात येत आहे. मनपा शाळांतील विद्यार्थ्याना सुपर ७५ या प्रकल्पाच्या माध्यमातून इंजिनिअर, डॉक्टर आणि केंद्रीय लोकसेवा परीक्षेच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे. ७५ ऑक्सिजन झोन शहरात तयार करण्यात येत आहेत, हे सांगताना त्यांनी ऑक्सिजन झोनमागील संकल्पना विषद केली. महापौर नेत्र ज्योती योजना, महापौर दृष्टी सुधार योजना आदी बाबत त्यांनी माहिती दिली. पुढील काही वर्षात देशात क्र. एकचे पर्यावरणपूरक उपक्रम राबविणारे शहर म्हणून नागपूरची ख्याती होईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापौर परिषदेत व्यक्त केले.
नागपुरातील या प्रकल्पांची माहिती ऐकून अनेकांनी कौतुक केले. अनेक महापौरांनी नागपुरला शिष्टमंडळ भेट देऊन या सर्व प्रकल्पांची माहिती घेईल, अशी तयारी दर्शविली.
अयोध्येत होत असलेल्या या परिषदेत ज्या शहरातून महापौर सहभागी झाले त्या शहरात प्रभू श्रीरामाशी संबंधित काय वास्तू किंवा स्थान आहे, याबाबत चर्चा करण्यात आली. त्या वास्तू किंवा स्थानांचा विकास करण्यासाठी एक रोडमॅप बनविण्याचे महापौर परिषदेत ठरले. विशेष म्हणजे अयोध्या शहराच्या विकासासाठी आमंत्रित महापौरांकडून सूचना मागविण्यात आल्या. या सूचनांच्या आधारे अयोध्या शहराच्या विकासाला आयाम देण्यात येईल, असेही या परिषदेत ठरले.
या दोन दिवसीय महापौर परिषदेत सहभागी झालेल्या सर्व महापौरांचा अखिल भारतीय महापौर परिषदेतच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अयोध्येतील विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांची माहितीही देण्यात आली.