नागपुरातील नागरिकांनी घेतले कोरोना लसीचे १८ लाखांवर डोज
Date : 14 Sep 2021
आतापर्यंत पहिला आणि दुसरा असे मिळून एकूण १८२६०५२ कोरोना लसीचे डोज मनपाच्या लसीकरण केंद्रांसह, शासकीय व खासगी केंद्रांमधून देण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची खबरदारी घेत नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला लस मिळावी यासाठी मनपाद्वारे विविध उपक्रमही राबविण्यात येत आहेत. लसीकरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मनपाची आरोग्य चमू झोपडपट्टी भागांमध्ये जाउन नागरिकांचे लसीकरणासाठी समुपदेश करते व ज्यांनी अद्यापही लस घेतली नाही, त्यांचे तिथेच त्यांच्या घरी लसीकरण करण्यात येत आहे.
नागपुरात टप्प्याटप्प्याने लसीकरण सुरू करण्यात आले. प्रथम चरणात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर, दुसऱ्या चरणात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील गंभीर आजार असणारे, तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्व व्यक्ती, चौथ्या टप्प्यात ३० वर्षावरील सर्व व्यक्ती तर पाचव्या टप्प्यात १८ वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरू करण्यात आले. प्रारंभी मनपा व शासकीय मिळून केवळ चार केंद्रावर सुरू करण्यात आलेले लसीकरण आज १६० पेक्षा अधिक केंद्रावरून होत आहे. गर्दीचे योग्य नियोजन आणि व्यापक जनजागृतीमुळे नागपूर शहराने लसीकरणाच्या पहिला डोजचा १० लाखांचा टप्पा ५ ऑगस्ट रोजी पार केला. तर आज दोन्ही डोजचा आकडा १८ लाखांच्यावर पोहोचला आहे. यामध्ये ७५४९६ आरोग्य कर्मचारी, ९२३१२ फ्रंट लाईन वर्कर, १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ७११६७९ व्यक्ती, ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ४४३१३८ व्यक्ती, ४५ ते ६० वर्ष वयोगटातील गंभीर आजार असलेले १३१५६२ व्यक्ती तर ६० वर्षावरील ३७१८६५ अशा एकूण १८२६०५२ व्यक्तींनी पहिला व दुसरा डोज घेतला.
कोरोना काळात नागरिकांनी पाळलेले निर्बंध, आजही सुरू असलेली त्याची अंमलबजावणी, नागरिकांचे मिळत असलेले सहकार्य आणि नागरिकांनी लसीकरणाला दिलेला प्रतिसाद यामुळे नागपूर शहर कोरोनावर नियंत्रण मिळवू शकले, अशी प्रतिक्रिया देत नागपूरकरांचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी अभिनंदन केले. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या संपूर्ण आरोग्य विभागाचे अभिनंदन केले. योग्य नियोजनाच्या भरवशावरच नागपुरातील लसीकरण उद्दिष्टपूर्तीकडे जात असल्याचे सांगितले.