शिर्डी नगर येथे आरोग्य व दंत तपासणी शिबीर
Date : 25 Oct 2021
महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मनपाचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, हनुमान नगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, मनपाचे अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात आरोग्य तपासणीसाठी १०७ शिबिर घेण्यात येत आहेत. त्याच श्रृंखलेत हनुमाननगर झोनमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून एक्स रे, ईसीजी, रक्त, मधुमेह तपासणीसह औषध वितरण करण्यात येत आहे. यासोबतच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने शहरात ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येत आहेत. याशिवाय ७५ नेत्र तपासणी शिबिर सुद्धा घेण्यात येत असून आरोग्य सुविधेच्या दृष्टीने मनपाद्वारे एकूण २७५ शिबिर घेण्यात येत आहेत. ‘आझादी -७५’ अंतर्गत नागपूर शहरामध्ये ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्ट निर्माण केले जात असून यापैकी २५ हेल्थ पोस्टचा शुभारंभ येत्या धन्वंतरी जयंतीला करण्याचा मानस यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर यांच्या नेतृत्वात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये नागरिकांच्या आरोग्य तपासणी अंतर्गत एक्स रे, ईसीजी, रक्त, मधुमेह तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर औषध देण्याची व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, ज्येष्ठ नागरिकांसाठी जेनेरिक औषधीची व्यवस्था शिबिरामध्ये करण्यात आली. मनपाच्या क्षयरोग तथा मलेरिया फायलेरिया विभागाची चमू शिबिरामध्ये सेवारत होते.
दंत तपासणी शिबिरामध्ये नागरिकांची दंत तपासणी करून त्यानंतर आवश्यकता असणा-या व्यक्तींच्या दातांची सफाई, फिलिंग सुद्धा दंत महाविद्यालयाच्या चमूद्वारे करण्यात आली. तपासणीमध्ये मुख कर्करोगाचा धोका असलेल्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. शिबिरामध्ये दातांची स्वच्छता, दातांमध्ये फिलिंग करणे, दात काढणे, कॅन्सरच्या धोक्याबाबत तपासणीद्वारे योग्य माहिती देण्यात आली. याशिवाय एक दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचाराबाबतही शिबिरामध्ये तपासणी आली. पुढील उपचार शासकीय दरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये करण्यात येतील. यासाठी तेथे शिबिराच्या माध्यमातून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात आले आहे.