गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाच्या कार्याला गती द्या : महापौर दयाशंकर तिवारी
तलावाच्या सौंदर्यीकरणाबाबत आढावा बैठक
Date : 25 Oct 2021
यावेळी आमदार विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेविका लता काटगाये, हर्षला साबळे, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, परिवहन व्यवस्थापक रवींद्र भेलावे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, नागपूर स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट मॅनेजर डॉ. प्रणिता उमरेडकर, धंतोली झोनचे अभियंता उज्ज्वल धनविजय, महाराष्ट्र विद्युत राज्य मंडळाचे श्रीवास्तव, ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसचे आर्किटेक्ट संदीप जोशी, मदर डेअरीचे विनोद पांडव आदी उपस्थित होते.
बैठकीत महापौरांनी गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरण कार्यात येत असलेल्या अडचणींचा आढावा घेतला. तलावाच्या विकासकामाच्या जागेवर मनपाचे बसस्थानक आहे. या स्थानकासह येथे स्मार्ट सिटी अंतर्गत लावण्यात आलेले कॅमेरे आणि किऑक्स तसेच मदर डेअरीसाठी अन्य ठिकाणी पर्यायी जागेचा शोध घेऊन स्थानांतरित करावे, असे निर्देश यावेळी महापौरांनी दिले.
गांधीसागर तलावाच्या विकास व सौंदर्यीकरणासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे निधी प्राप्त झालेला आहे. याअंतर्गत तलावाच्या सर्व बाजूंचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. येथे पायी चालण्यासाठी ट्रॅक, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था असेल. तलावाच्या मध्यभागी आकर्षक कारंजे बसविण्यात येतील. अम्यूजमेंट करिता बालभवनलगत मोठी इमारत बांधण्यात येणार आहे. तलावाच्या मध्यभागी असलेल्या भाऊजी पागे उद्यानापर्यंत जाण्याकरीता एक पूल बांधण्यात येईल. तलावामध्ये साचलेला गाळसुध्दा काढण्यात येईल. तसेच येथे येणा-या घाण पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पसुद्धा उभारण्यात येणार आहे. गांधीसागर तलाव हा हेरीटेज तलाव आहे. पुरातन वास्तूचे जतन करुन तशाच पध्दतीने या तलावाचे विकास कार्य करण्यात येईल. महाराष्ट्र शासनातर्फे १२ कोटी रुपये आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे २.९० कोटी रुपयांचे प्रावधान विकास कार्यासाठी करण्यात आले आहे.