हत्तीरोग दुरीकरण मोहिमेने गाठले ९०.०६ टक्के लक्ष्य
११९०८८४ नागरिकांनी खाल्ल्या हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या
Date : 23 Jun 2022
मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. राम जोशी, सहाय्यक संचालक (आरोग्य सेवा) डॉ. निमगडे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या मार्गदर्शनात हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलाणी यांच्या नेतृत्वात विभागाचे निरीक्षक आणि कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने ही मोहिम पूर्ण झाली.
नागपूर शहरातील लक्ष्मीनगर (८), धरमपेठ (२), हनुमाननगर (५), धंतोली (३) आणि नेहरूनगर (१५) या पाच झोनमध्ये ३३ हत्तीरोगाचे रुग्ण आढळले होते. यानंतर या ५ झोनमध्ये निवडलेल्या लोकसंख्येला हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या खाऊ घालण्याची मोहिम हाती घेण्यात आली व त्याला गती देण्यात आली. शासनाने आय.डी.ए. हत्तीरोगाच्या गोळ्या वयानुसार व उंचीनुसार जनतेला खाऊ घालण्याची मोहिम २५ मे २०२२ ते ५ जून २०२२ या कालावधीत राबविण्यास सुरूवात केली. उन्हाळा आणि इतर कारणांमुळे या मोहिमेत येणा-या अडचणी लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या दिल्या जाव्यात यासासठी मोहिम २२ जून २०२२ पर्यंत वाढविण्यात आली.
शासनाने दिलेले उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याकरिता हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. ध्वनीप्रक्षेपकावरून तसेच विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे हत्तीरोगामुळे शरीरावर येणा-या विद्रुपतेची माहिती देण्यात आली व नागरिकांना हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या खाण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचे परिणाम नागरिकांनी मोहिमेला उत्तम प्रतिसाद दर्शविले. जनतेच्या प्रतिसादामुळे मोहिमेला ९०.०६ टक्के लक्ष्य गाठता आल्याचे हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांनी सांगितले.