शहर स्वच्छतेबाबत वर्तवणुकीत बदल आवश्यक : मनपा आयुक्त
‘ब्लॅक स्पॉट’ हटविण्याबाबत स्वयंसेवी संस्थांनी मांडली संकल्पना
Date : 14 Sep 2022
नागपूर शहरात निर्माण झालेले कच-याचे ढिगारे किंवा दुर्गंधीयुक्त स्थाने अर्थात ‘ब्लॅक स्पॉट’ हटविण्याबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी मनपा आयुक्तांपुढे संकल्पना मांडली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकी इमारतीतील सभागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणी, उपद्रव शोध पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबे, हर्षल बोपर्डीकर यांच्यासह रोटरी, वेद आणि तेजस्विनी महिला मंडल चे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील सर्व दुर्गंधीयुक्त स्थाने हटवून त्याचे सौंदर्यीकरण करणे, कचरा कुठेही उघड्यावर टाकून त्याचे ढिगारे निर्माण होउ नये यासाठी उपाययोजनात्मक संकल्पनांची मांडणी स्वयंसेवी संस्थांद्वारे करण्यात आली. यासंदर्भात धरमपेठ झोनमध्ये प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने कार्य करण्यात येणार असल्याचे स्वयंसेवी संस्थांद्वारे सांगण्यात आले. शहरातील चौक, हेरिटेज स्थळे आदी भागांच्या सौंदर्यीकरणाबाबत आराखडा तयार करून व एक थीम निर्धारित करून कार्य करण्याची सूचना यावेळी मनपा आयुक्तांनी सर्व प्रतिनिधींना केली.