आतापर्यंत श्रीगणेशाच्या ७१७७ मूर्तींचे विसर्जन
३.२२ टक्के मूर्ती पीओपीच्या तर ९६ टक्के मातीच्या
Date : 26 Sep 2023
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील सर्व विसर्जन स्थळे व्यवस्थित कार्यरत आहेत. बुधवार २७ सप्टेंबरपासून ९, १० आणि ११ दिवसांच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यादृष्टीने देखील मनपाची सर्व तयारी पूर्ण झालेली असून ४ फुटापर्यंतच्या मूर्ती शहर हद्दीमधील कृत्रिम विसर्जन टँकमध्ये तर ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावामध्ये करण्यात येणार आहे. कोराडी येथील विसर्जन स्थळी देखील सर्व व्यवस्था पूर्णत्वास आलेली आहे. नागरिकांनी शांततापूर्ण रितीने सर्व विसर्जनस्थळी श्रीगणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करावे तसेच निर्माल्य कलशामध्येच श्रीगणेशाचे निर्माल्य जमा करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
बुधवारी २० सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या विसर्जनापासून शहरात मूर्ती विसर्जनाला सुरूवात झाला. यानंतर तीन दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या श्रीगणेशाच्या मूर्तींचे विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या विसर्जनानुसार दीड दिवसांच्या श्रीगणेशाच्या १२७४ मूर्तींचे, तीन दिवसांच्या श्रीगणेशाच्या ९१२ मूर्तींचे, पाच दिवसांच्या श्रीगणेशाच्या २५७९ मूर्तींचे आणि सात दिवसांच्या श्रीगणेशाच्या २४१२ मूर्तींचे विसर्जन झाले. एकूणच आतापर्यंत एकूण ७१७७ मूर्तींचे विसर्जन झालेले असून यामध्ये ६९४६ मूर्ती मातीच्या तर २३१ मूर्ती पीओपीच्या आढळून आलेल्या आहेत.