पुरग्रस्त भागातील नागरिकांना मनपातर्फे अन्नधान्याच्या ६९४३ किट वितरीत
गंगानगर, भदन्त आनंद कौशल्यायन झोपडपट्टीतील नागरिकांशी आयुक्तांनी साधला संवाद
Date : 27 Sep 2023
आयुक्तांनी दोन्ही पुरग्रस्त ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत असलेले सर्वेक्षण आणि पंचनाम्याबाबत विचारणा केली व नागरिकांना अन्नधान्याचे किट प्रदान केले.
मुसळधार पावसामुळे गोरेवाडा तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि येथील नाले ओसंडून वाहू लागले. त्याचा फटका जवळच्या वस्त्यांना बसला. मंगळवारी झोनमधील मानकापूर येथील गंगानगर झोपडपट्टीमध्ये गोरेवाडा तलावाचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांची घरे पाण्याखाली आणि व त्यांचे नुकसान झाले. या भागामध्ये बुधवारी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांन भेट दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आयुक्तांनी सर्वेक्षण, पंचनामे आणि स्वच्छतेबाबत देखील नागरिकांचे मत जाणून घेतले. गंगानगर झोपडपट्टीमध्ये सर्वेक्षण कार्य पूर्ण झाले असून कर्मचा-यांनी वस्त्यांचे पंचनामे देखील केल्याचे नागरिकांनी सांगितले. याशिवाय पुरामुळे परिसरात निर्माण झालेली अस्वच्छता आणि चिखल काढण्यासाठी मनपाच्या स्वच्छता विभागाच्या चमूची मोठी मदत झाल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. आयुक्तांच्या हस्ते गंगानगर झोपडपट्टीतील प्रेमलता आशिष पांडे आणि विमला खरे यांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याची किट प्रदान करण्यात आली. यावेळी मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त श्री. अजय कुरवाडे, कार्यकारी अभियंता श्री. गिरीश वासनिक, श्री. प्रमोद वानखेडे, श्री. किशोर चौरे, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, श्री. अजय परसटवार, श्री. दोनाडकर उपस्थित होते.
यानंतर आयुक्तांनी आशीनगर झोनमधील भदन्त आनंद कौशल्यायन झोपडपट्टी पिवळी नदी येथे भेट दिली व येथील नागरिकांशी संवाद साधला. येथील सर्वेक्षण आणि पंचनाम्याची स्थिती देखील त्यांनी जाणून घेतली. नागरिकांनीही परिसरात सर्वेक्षण आणि पंचनामे झाले असल्याचे सांगितले. यावेळी झोनचे सहायक आयुक्त श्री. हरीश राउत, कार्यकारी अभियंता श्री. अजय पझारे, उपअभियंता श्री. सुनील गजभिये, झोनल अधिकारी रोशन जांभुळकर उपस्थित होते.
पुरग्रस्त परिवारांना आधार म्हणून नागपूर महानगरपालिेकेद्वारे अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याची किट उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेण्यात आला आहे. गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तेल, तूर डाळ, बेसन, मिरची पावडर, मिठ या जीवनावश्यक साहित्यांचा समावेश असलेली किट नागरिकांना देण्यात येत आहे. या किटमुळे पुढील काही दिवस जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत या पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे.