रामदासपेठ पुलाचे काम त्वरीत पूर्ण करा
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश
Date : 28 Sep 2023
नागपूर, ता. २७ : शहरातील रामदासपेठ येथे सुरू असलेले नाग नदीवरील पुलाचे काम त्वरीत पूर्ण करून रस्ता सुरळीत करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
आयुक्तांनी बुधवारी २७ सप्टेंबर रोजी रामदासपेठ येथील नाग नदीवरील निर्माणाधिन पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी उपस्थित होते.
रामदासपेठ येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉ. वि. भि. उपाख्य भाउसाहेब कोलते ज्ञान स्त्रोत केंद्र (मुख्य ग्रंथालय) ते कल्पना बिल्डिंग टी पाईंटकडे जाणा-या मार्गावर नाग नदीवरील पूल धोकादायक स्थितीत गेल्याने तो पाडण्यात आला. त्यानंतर पुलाचे काम सुरू करण्यात आले. यानंतर या मार्गावरील वाहतूक अलंकार चौकातून सेंट्रल बाजार रोडने वळविण्यात आली आहे. वाहतुकीस अनेक अडचणी येत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले.
त्यांनी संपूर्ण कामाची पाहणी केल्यानंतर सदर कामात येत असलेल्या अडचणी नोंदवून त्या तातडीने दूर करून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.