वायू गुणवत्ता व्यवस्थापनासंदर्भात मनपामध्ये बैठक
Date : 28 Sep 2023
नागपूर, ता. २६ : नागपूर शहरातील वायू गुणवत्ता व्यवस्थापनासंदर्भात मंगळवारी (ता.२६) मनपा मुख्यालयामध्ये आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली.
बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त सर्वश्री रवींद्र भेलावे, डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. विजय देशमुख, ‘नीरी’च्या चीफ सायंटिस्ट डॉ. पद्मा राव, प्रिसिंपल सायंटिस्ट डॉ. संगीता गोयल यांच्यासह विनोद चौधरी, सहायक पोलिस आयुक्त वाहतुक, हर्षल डाके, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, संदीप लोखंडे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, मनपा सह नागरी स्तरीय समितीचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर शहराच्या काही भागांमध्ये वायू गुणवत्ता संनियंत्रण स्थानक उभारण्यात आलेले आहेत. या स्थानकांवर शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविली जाते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दिशानिर्देशानुसार काही ठिकाणचे स्थानक हे स्थानांतरीत करण्याची गरज असल्याचे मत यावेळी ‘नीरी’च्या वैज्ञानिकांनी व्यक्त केली. धुळीमुळे देखील शहरातील हवेची गुणवत्ता कमी होत असून अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. पूल, रस्ते वा अन्य बांधकाम स्थळी दिवसातून किमान दोनदा पाण्याची फवारणी केल्यास धुळ कमी करता येउ शकेल, अशी देखील सूचना बैठकीत मांडण्यात आली.
शहरातील विविध मार्गांवरील दुभाजकांवर हिरवळ निर्माण करणे तसेच काही चौकांचे सौंदर्यीकरण करून तेथेही हिरवळ निर्माण केल्यास हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. याशिवाय शहरातील शहरातील वेगवेगळ्या रहिवाशी क्षेत्रांमध्ये मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करून वनआच्छादन निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. संबंधित विभागांद्वारे प्रस्तावित जागांची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी अधिका-यांना दिले.