महिनाभरात १८.६३ कोटी थकीत मालमत्ता कर जमा
मनपा ‘अभय योजना’ २५८७९ मालमत्ता धारकांनी घेतला योजनेचा लाभ
Date : 07 Feb 2024
थकीत मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागाचे दुकाने, ओटे, जागेच्या वापर शुल्कावरील शास्ती व दंडात ८० टक्के सूट देणा-या ‘अभय योजना’चा शुभारंभ १ जानेवारी रोजी नागपूर महानगरपालिकेने केला. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही योजना सुरू राहणार असून नागपूरकरांना मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागातील दुकाने, जागा, ओटे आदींची थकबाकी चुकवण्यात सुलभता प्रदान करण्याच्या हेतूने ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार २५८७९ थकीत मालमत्ता कर धारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या मालमत्ताधारकांना अभय योजनेमुळे ४.६४ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती उपायुक्त (महसूल) श्री. मिलींद मेश्राम यांनी दिली.
‘अभय योजने’चा नेहरूनगर झोनमधील सर्वाधिक ४११६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. या लाभार्थ्यांकडून २ कोटी २३ लक्ष ८० हजार ४४१ रुपये थकीत मालमत्ता कर प्राप्त झाले. तर लक्ष्मीनगर झोनच्या ३७९० कर धारकांनी सर्वाधिक २ कोटी ९२ लक्ष ३९ हजार ३१३ रुपये थकीत मालमत्ता कर जमा केले आहे. यापाठोपाठ आशीनगर झोनमधील ३६९५ कर धारकांनी २ कोटी ७९ लक्ष ५९ हजार २१९ रुपये थकीत मालमत्ता कर मनपा निधीत जमा केला.
‘अभय योजने’ अंतर्गत नागरिकांना १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर, पाणी शुल्क, बाजार विभागाचे दुकाने, ओटे, जागेच्या वापर शुल्कावरील शास्ती व दंडात ८० टक्के सूट दिली जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी मनपा मुख्यालय किंवासंबंधित झोन कार्यालयात जाउन किंवा ऑनलाईन पद्धतीने कर/शुल्क जमा करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.