बांधकाम मलबा संकलनाचे कार्य मनपातर्फे सुरू
Date : 30 Mar 2024
शहरातील बांधकाम मलबा उचलून तो पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात मलबा संकलित असलेल्या भागांचा शोध घेउन ती माहिती उपद्रव शोध पथकाद्वारे संकलित करण्यात आली. प्रभागनिहाय पडून असलेला मलबा ‘सी अँड डी वेस्ट’ एजन्सीच्या मदतीने झोनमधील उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग करून उचलण्यात येणार आहे.
उपद्रव शोध पथकाने संकलित केलेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगर झोनमध्ये २६ ठिकाणी, धरमपेठ झोनमध्ये ५४ ठिकाणी, हनुमान नगर झोनमध्ये १६ ठिकाणी, धंतोली झोनमध्ये २१ ठिकाणी, नेहरू नगर झोनमध्ये २९ ठिकाणी, गांधीबाग झोनमधील २२ ठिकाणी, सतरंजीपुरा झोनमधील १३ ठिकाणी, लकडगंज झोनमध्ये ११ ठिकाणी, आशीनगर झोनमधील ३० ठिकाणी आणि मंगळवारी झोनमधील २७ ठिकाणी बांधकाम मलबा अर्थात सी अँड डी वेस्ट आढळून आलेला आहे. याशिवाय शहरात शासकीय संस्थांमार्फत सुरू असलेल्या विकास कामांच्या स्थळी निर्माण होणारा मलबा देखील पथकामार्फत उचलण्यात येणार आहे.