मनपातील ४०४ पदांवर होणार प्रशिक्षणार्थींची निवड
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत अर्ज आमंत्रित
Date : 25 Jul 2024
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने ५ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवाराला प्रतिमहा ६ हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना ८ हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान त्यांची दैनिक हजेरी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांचे विद्यावेतन थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे व त्याचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. योजनेत सहभागी होवू इच्छीणाऱ्या उमेदवारांनी इतर अटीची माहिती सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियांत्रिकी सहाय्यक, अग्निशामक विमोचक, कनिष्ठ लिपीक, स्वच्छता निरीक्षक, सहायक शिक्षक (यु.डी.टी. माध्यमिक), सहायक शिक्षक (एल.डी.टी. माध्यमिक), वृक्ष अधिकारी, वायरमन या पदांवर ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. सदर प्रशिक्षणाचा कालावधी सहा महीने असणार आहे.