डासांची उत्त्पती रोखण्यासाठी प्रभाग निहाय ‘फॉगिंग’ व ‘स्प्रेईंग’ वर भर
डेंग्यू, चिकनगुनिया च्या प्रतिबंधासाठी मनपाचा उपाय
Date : 30 Aug 2024
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे वेगवेगळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. सध्यस्थितीत शहरात चिकनगुनियाचे ४३५ रुग्ण व डेंग्यूचे १०५ रुग्ण आहेत.
मनपाने धूर फवारणी (फॉगिंग) आणि ‘स्प्रेईंग’ करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची दिले असून, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 50 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच जीपीएस ट्रॅकर असणाऱ्या 10 फॉगिंग गाडीवर झोन निहाय तैनात करण्यात आल्या आहेत. याद्वारे दररोज सकाळी आणि संध्याकाळी फॉगिंग करण्यात येत आहेत. याशिवाय मनपाच्या दहाही झोन निहाय रॅपिड रिस्पॉन्स टीमचे तैनात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी डेंग्यू चिकनगुनिया सारख्या आजाराचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत अशा ठिकाणी चमूद्वारे त्वरित कंटेनर सर्वेक्षण, धूर फवारणी ‘स्प्रेईंग’ सारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तसेच आशा सेविकांद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण कार्य केले जात आहे.आशा सेविकांना प्रत्येकांच्या घरी कमीत कमीत दोन वेळा तपासणी करायची आहे.प्रत्येक आशा सेविका या प्रमाणे तपासणी करत आहे. आजवर आशा सेविका कडुन ७ लाख ५० हजार ८२१ हून अधिक घरंचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढे सांगितले की, शासनाद्वारे दिलेल्या ५६ ब्रीडिंग चेकर्सची संख्या लवकरच वाढवून ११० करण्यात येणार आहेत. डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज असून, औषधांचा साठा, तपासणीची सोय करण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य वर्धिनी केंद्रांची संख्या वाढविण्याचा मनपाचा मानस असून, लवकरच 11 पोलीक्लीनिक सुरू करण्यात येणार आहे. जेणे करून रुग्णांना त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेता येणार असल्याचेही आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.
घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुलर, कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे. याशिवाय ताप असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस "कोरडा दिवस" म्हणून पाळावा असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.