क्षयरोग मुक्तीसाठी लसीकरणात सहकार्य करा : अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल
बीसीजी लसीकरण सत्राला ४ सप्टेंबर पासून सुरुवात
Date : 02 Sep 2024
केंद्र सरकारच्या क्षयमुक्त भारत अभियाना अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकण कार्यक्रम कक्ष व आयसीएमआर च्या संयुक्त विद्यमानाने ‘अडल्ट बीसीजी व्हॅक्सिनेशन कॅम्पेन’ राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील ४० जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत असून राज्यभरात अंदाजे १.२ कोटी नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे. या प्रकल्पाकरीता महाराष्ट्रातून नागपूर महानगरपालिकेची निवड करण्यात आली आहे.
क्षयरोग निर्मूलन लसीकरण अभियानाअंतर्गत १८ वर्षावरील व्यक्तींना व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पात्र व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. यामध्ये मागील पाच वर्षात क्षयरोग झालेले, ६० वर्षावरील व्यक्ती, धुम्रपान करणारे व्यक्ती, क्षयरुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती, मधुमेह असलेले व्यक्ती, ज्यांचा बीएमआय १८ पेक्षा कमी आहे, कुपोषित, प्रौढ व्यक्ती असे व्यक्ती या लसीकरणाचे लाभार्थी राहणार आहेत.
शासनाच्या या लसीकरण मोहिमेकरीता नागपूर महानगरपालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, जीएनएम, संबंधित कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. १८ वर्षावरील व लस घेण्यास संमती दर्शविलेल्या पात्र व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील नागरी आरोग्य केंद्र, मनपाचे सर्व दवाखाने, हेल्थ पोस्ट, आरोग्यवर्धिनी केंद्र, आपला दवाखाना यांच्या अंतर्गत येणारे वैद्यकीय अधिकारी जीएनएम, एएनएम, लसीकरण नियंत्रक यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अति. वैद्यकिय आरोग्य अधिकारी, डॉ. नरेंद्र बहिरवार, एसएमओ, डब्लूएचओ डॉ. साजिद खान, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी केले आहे.