मनपाद्वारे ‘श्रीं’ चा विसर्जनासाठी 419 कृत्रिम हौदाची व्यवस्था
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साठी मनपा सज्ज
Date : 04 Sep 2024
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात शहरातील ठीक-ठिकाणी एकूण ४१९ कृत्रिम विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपातर्फे पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तलावांच्या संरक्षणासाठी मनपातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था शहरातील विविध प्रभागात करण्यात आली आहे. यात कच्छी वीसा ओसवाल भवन, गांधीसागर तलाव, सोनेगांव तलाव येथे मोठे कृत्रिम टँक निर्माण करण्यात आले आहेत. तर सार्वजनिक गणेश मंडळासाठी कोराडी येथे विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घरी मातीच्या बाप्पाची स्थापना करावे, विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन टँकचा वापर करावा असे आवाहन केले आहे. यावर्षी मा. उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेश मंडळाना पीओपी मूर्तीची स्थापना नाही करण्याचे हमीपत्र देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत गणेश भक्तांच्या सोयीनुसार शहरात ४१९ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सेट्रिंगचे ३३१ , रबरीचे 31, खड्डे करून 32, कॉक्रीटचे 3 आणि फिरते 22 टँक राहणार आहेत. एक-दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी 7 झोनमध्ये 30 कृत्रिम टंकची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मीनगर येथे 2 ठिकाणी, धरमपेठ येथे 7 ठिकाणी, हनुमान नगर व सतरंजीपुरा येथे 2 ठिकाणी, तर धंतोली, नेहरुनगर व मंगळवारी येथे प्रत्येकी एक ठिकणी कृत्रिम टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय तीन दिवशीच्या “श्रीं” च्या मूर्तीच्या विसर्जनाकरीता लक्ष्मीनगर येथे 3, धरमपेठ येथे 16, हनुमान नगर येथे 8, धंतोली येथे 1, मंगळवारी येथे 1, नेहरू नगर व सतरंजीपूरा येथे प्रत्येकी 2 टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पाच दिवसांच्या श्रींसाठी एकूण 64 ठिकाणी कृत्रिम टँक व सातव्या दिवशी 92 कृत्रिम टँक विसर्जनासाठी राहणार आहेत. अनंत चर्तुदशी दहाव्या दिवशी ४१९ ठिकाणी टँक विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कृत्रिम टँकमध्ये वापरले जाणारे पाणी तसेच विसर्जीत मूर्तींची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली जाईल, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. याशिवाय त्यांनी सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य कलशांची व्यवस्था करणे तसेच परिसरात नियमित स्वच्छता राखली जावी यादृष्टीने स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक करण्याचे त्यांनी निर्देशित केले.