शिक्षक दिनी मनपाच्या आदर्श शिक्षकांचा पुरस्काराने गौरव
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते शिक्षकांचा सन्मान
Date : 05 Sep 2024
कार्यक्रमात मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, शिक्षक संघटनेचे सचिव श्री. देवराव मांडवकर, श्री. नितीन बोडे, सहायक शिक्षणाधिकारी संजय दिघोरे, सुभाष उपासे यांच्यासह शाळा निरीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उपक्रमशील शिक्षिका श्रीमती माधुरी काटकर, संजय नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या चित्रकला शिक्षिका श्रीमती प्रगती सरोदे, मकरधोकडा हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या सहायक अध्यापिका श्रीमती ममता पांडे, पन्नालाला देवडिया हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका नुसरत खालिद, नेताजी मार्केट हिंदी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती शारदा मिश्रा यांच्यासह सेवानिवृत्त शाळा निरीक्षक श्रीमती वीणा लोणारे, माजी मुख्याध्यापिका श्रीमती भारती सोनकुवर, श्रीमती रंजना गोतमारे, श्रीमती रुखसाना सईद यांचा मनपाचा मानाचा दुपट्टा, शाल, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मार्गदर्शन करीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, एक साक्षर, सुजाण आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडविण्यात शिक्षकांचे आमूलाग्र योगदान आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणात व त्यांच्या सर्वांगीण विकाकासात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे. शाळांच्या भौतिक विकासासह गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यावर मनपाचा अधिक भर आहे. त्याकरिता शिक्षकांचे प्रशिक्षण सत्रासह विविध उपक्रम देखील राबविल्या जात आहेत. तरी शिक्षकांनी मनपाद्वारे शिक्षकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थांना स्वतःच्या मुला प्रमाणे जपावे, लहानशी तक्रार असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहनही आयुक्त डॉ. चौधरी यांनी केले.
यावेळी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून मनपाद्वारे मागील शैक्षणिक वर्षात राबविलेल्या आणि यंदाच्या वर्षी नियोजित अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच शिक्षकांनी विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासासह भावनात्मिक आणि सर्वांगीण विकासावर भर द्यावे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी मनापाद्वारे राबविण्यात येणाऱ्या मिशन नवचेतना, माजी शाळा सुंदर शाळा, मराठी आणि हिंदी माध्यमिक शाळेत दर शनिवारी आणि उर्दू माध्यमिक शाळेत दर शुक्रवारी राबविण्यात येणाऱ्या दप्तर मुक्त शाळा, सुपर ७५ उपक्रम, विज्ञान शिक्षकांचे प्रशिक्षण आदी विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच सध्याचे युग अद्ययावत होत असून शिक्षकांनी देखील नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीवर भर देत अद्ययावत व्हायला हवे आहे. असे सांगितले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी दुर्गानगर उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सदर केले. तर संगीत शिक्षक प्रकाश कलासिया, आदित्य धरमारे, शेषराव उपरे, श्रीमती आशा मडावी यांनी विद्यार्थ्यांना उत्तम साथ दिली केले. कर्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यासह १२८ सेवानिवृत्त शिक्षकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपा शिक्षिका श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले.