नागरी तक्रारी प्राधान्याने सोडविण्यावर भर द्या: आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी
आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या सक्त सूचना
Date : 12 Sep 2024
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरी तक्रारींच्या संदर्भात गुरुवारी (ता: 12 ) आयुक्त सभा कक्षात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत नागपूर महानगर पालिकेला एका वर्षात 19512 तक्रारी विविध माध्यमांवरून प्राप्त झाल्याची माहीती ठेवण्यात आली. प्राप्त तक्रारी मधून 18953 तक्रारी सोडविण्यात आल्या, तर 559 तक्रारींवर प्रक्रिया सुरु आहे. तसेच 274 तक्रारीं सोडविण्या करिता निधीची आवश्यकता आहे. बैठकीत माहिती देण्यात आली की, मनपा तर्फे 13016 तक्रारींचे निवारण विहित कालावधीत करण्यात आले. मनपा तर्फे तक्रारींचे निवारण करण्याकरिता विशिष्ट कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. मनपा आयुक्तांनी नागरिकांना आपल्या तक्रारी 'माय नागपूर' अँपच्या माध्यमाने नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, श्री. अजय चारठाणकर, मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहायक आयुक्त सर्वश्री. मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, नरेंद्र बावनकर, गणेश राठोड, प्रमोद वानखेडे, हरीश राऊत, घनशाम पंधरे, अशोक घरोटे, विजय थूल, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे स्वप्नील लोखंडे, यांच्यासह कार्यकारी अभियंता, इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडविण्यावर भर देत आपल्याकडे येणाऱ्या तक्रारींचे रीतसर नियोजन करावे, नियमितपणे प्रलंबित तक्रारींच्या कार्यवाहीचा पाठपुरावा करावा, नागरिकांकडून येणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी मनपा मुख्यालयात तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, या यंत्रणेत कार्यरत कर्मचा-यांना मनपा आयुक्तांनी प्रत्येक तक्रारीला प्राधान्याने वेळ देऊन ती संबंधित विभागाकडे वर्ग करून त्याचा पाठपुरावा करावा, तसेच तक्रारदारांना समाधानकारक प्रतिसाद देण्याबाबत आयुक्त डॉ. चौधरी यांनी निर्देशित केले.
याशिवाय सर्व झोनल अधिकारी आणि विभाग प्रमुखांनी स्वतः जबाबदारीने तक्रार निवारण प्रणालीकडे लक्ष द्यावे, तसेच कामात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित नोटीस देण्यात यावी, त्यांच्याकडून समाधान कारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी असे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिले.