मनपातील 110 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान
Date : 13 Sep 2024
नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे अर्पण व्हॉलंटरी रक्तपेढीच्या सहकार्याने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान जनजागृती करीत शुक्रवारी (ता:13) मनपा मुख्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सौम्या शर्मा- चांडक, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, मुख्य अग्नीशमन अधिकारी श्री. बी.पी चंदनखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. मनपातील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित 110 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करित मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, यंदाच्या गणेशोत्सवात एक अत्यंत स्तुत्य उपक्रम प्रशासनाने हाती घेतला असून, त्यानुसार विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. शहरात रक्ताचा जाणवणारा तुटवडा भरुन काढण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे. तरी विविध मंडळांनी आपल्या मंडळात रक्तदान शिबिर आयोजित करावी आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, असेही आवाहन मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. तसेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा सर्वांनी प्रयत्नशिल असावे असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले आहे.
आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मनपातील अधिकारी व कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे यांच्यासह इतर अग्नीशमन विभागाच्या जवानांनी व पत्रकार प्रसून चक्रवर्ती यांनी रक्तदान केले.