सामुदायिक आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पहिल्याच दिवशी साडेपाच हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
Date : 28 Sep 2024
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ३८ आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात येत आहेत.
सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान, शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया, रक्त व लघवी चाचणी आणि ई.सी.जी. या सर्व तपासणी विनामूल्य करण्यात येतात. याव्यतिरिक्त आवश्यक सीटी स्कॅन किंवा एमआरआय हे संदर्भीत करून विनामूल्य दिले जात आहे. या शिबिराचा मुख्य उद्देश सामाजिकदृष्ट्या मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णाची तपासणी व रोग निदान, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य योजनांबाबत रुग्णांना अवगत करणे, स्थानिक पातळीवर सर्वसामान्य व्याधींचे उपचार करणे, गरजेनुसार आवश्यकता भासल्यास शिबिरानंतर विशेष संदर्भीत निदानात्मक तथा उपचारात्मक सेवा उपलब्ध करून देणे, हा शिबिराचा उद्देश आहे.
शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी आयोजित शिबिरामध्ये २२६६ पुरूष आणि ३२७४ महिला अशा एकूण ५५४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १४४१ रुग्णांची लॅबमध्ये चाचणी करण्यात आली. ५४१७ रुग्णांना औषध पुरविण्यात आले. १० रुग्णांचे सीटी स्कॅन, १४ रुग्णांचे एमआरआय, ३१ रुग्णांचे ३१ यूएसजी करणे आवश्यक असल्याने त्यांना त्यासाठी पाठविण्यात आले. एकूण १८३ रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज लक्षात आली. यापैकी ४३ रुग्णांची हृदयरोग शस्त्रक्रिया, ५० रुग्णांची जनरल शस्त्रक्रिया, १२ रग्णांची स्त्री रोग शस्त्रक्रिया व विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.