मनपा शाळांच्या ‘बोलक्या भिंती’ करिता सरसावल्या संघटना
मनपा, डब्ल्यूसीएल आणि झिरो ग्रॅव्हिटी यांच्यात त्रिपक्षीय करार
Date : 30 Sep 2024
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या कक्षात हा करारनामा करण्यात आला. मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, डब्ल्यूसीएलचे सीएसआर महाव्यवस्थापक श्री. ए.के. सिंग, झिरो ग्रॅव्हिटी डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशनच्या संस्थापिका मैत्रेयी श्रीकांत जिचकार यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, डब्ल्यूसीएलचे उपव्यवस्थापक श्री. शेखर आर., व्यवस्थापक एस.धीरज उपस्थित होते.
मिशन नवचेतना प्रकल्पाच्या माध्यमातून मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेता यावे याकरिता शाळेच्या भिंती बोलक्या करण्याची संकल्पना मांडण्यात आली. या कार्यात सीएसआर निधी प्रदान करून मनपाला सहकार्य करण्यासाठी डब्ल्यूसीएल आणि झिरो ग्रॅव्हिटी डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशन या संघटना सरसावल्या आहेत. या संघटनांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेच्या पाच शाळांमधील अनेक वर्गखोल्यांच्या भिंतींना विविध विषयांच्या अनुरूप चित्ररूप देउन बोलक्या करण्यात येईल.
मनपाच्या एकात्मता नगर मराठी उच्च प्राथमिक शाळा जयताळा येथील ६ वर्गखोल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा हायस्कूल उंटखाना येथील १० वर्गखोल्या, प्रियदर्शनी उच्च प्राथमिक मनपा शाळा फुटाळा ८ वर्गखोल्या आणि एक सभागृह, आझाद नगर उर्दू मनपा प्राथमिक शाळा आझाद नगर ९ वर्गखोल्या आणि क्रीडा साहित्य, राम मनोहर लोहिया हायस्कूल टेलिफोन एक्सचेंज चौक येथील ८ वर्गखोल्या आणि क्रीडा साहित्य असे ५ शाळांमधील ४२ वर्गखोल्या, सभागृह आणि क्रीडा साहित्यांबाबत मनपाला डब्ल्यूसीएल आणि झिरो ग्रॅव्हिटी डॉ. श्रीकांत जिचकार फाउंडेशनद्वारे सहकार्य केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये मनपाच्या पाच शाळांमधील भिंतींना बोलके स्वरूप देण्यात येणार आहे. यानंतर अन्य शाळांचे काम हाती घेण्यात येणार आहे. मनपाच्या पाचही शाळांमधील ‘बोलक्या भिंती’ साकारण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सर्व शाळांचे काम पूर्ण करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सूचना केली.