नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कॅम्पसचे भूमिपूजन
गरीब घरातील मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे होणार खुली
Date : 09 Oct 2024
नागपूर शहरातील वाठोडा येथील ४५ एकर क्षेत्रावर अत्याधुनिक, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार अशा केजी टू पीजी भव्य शैक्षणिक कॅम्पस साकारले जाणार आहे. या कार्याचे गिड्डोबा नगर, वाठोडा ले आऊट, पाण्याच्या टाकी जवळ आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई चे अध्यक्ष आणि नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज विद्यापीठाचे कुलपती
आमदार श्री. अमरिशभाई पटेल यांनी नागपुरात संस्था सुरु केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या संस्थेमुळे नागपुरातील गरीब घरच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे खुली होतील, असा विश्वास ना. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. अनेक शैक्षणिक संस्थामुळे नागपूर 'एज्युकेशन हब' झाले आहे. यात आता देशातील नामवंत प्रतिष्ठीत नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या अभिमत विद्यापीठाची भर पडणार असल्याने नागपूरसह विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी 'नरसी मोनजी' मुळे दर्जेदार शिक्षणाचे नागपूरकरांसाठी नवे दालन खुले झाल्याचे मत व्यक्त केले. 'नरसी मोनजी' या संस्थेने गुणवत्ता कायम राखली आहे. नागपुरातील भावी पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल.’ उत्तम शाळा, कॉलेजेस जिथे असतात त्या प्रदेशाचा विकास होतो. मानव संसाधनांची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे मानव संसाधन तयार करणाऱ्या संस्थांचे महत्त्व देखील खूप आहे. देशातील सगळ्या आयकोनिक संस्था नागपूरमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. नागपूर हळूहळू एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला येत आहे, असेही ते म्हणाले. नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा आरक्षित असतील आणि शुल्कामध्ये २० टक्के सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार श्री. विजय दर्डा, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, मोहन मते, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, श्री. अजय चारठाणकर, एस.व्ही. के.एम.चे अध्यक्ष तसेच एन.एम.आय.एम.एस. विद्यापीठ, मुंबई चे कुलपती आमदार श्री. अमरिशभाई आर. पटेल, एस.व्ही. के.एम.चे सचिव डॉ.जे.पी.गांधी, एसव्हीकेएम एनएमआयएमएस ग्लोबल युनिवर्सिटी, धुळे च्या कुलपती सौ. स्नेहा अंकीत पारीख, माजी नगरसेवक श्री. जितेंद्र (बंटी) कुकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले व आभार डॉ. जे.पी. गांधी यांनी मानले.
प्रकल्पाची माहिती
४२० कोटी रुपयांच्या निधीमधून सदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक भांडवली गुंतवणुक श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेकडून करण्यात येणार आहे. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित नागपूर कॅम्पसमध्ये नागपूर जिल्ह्यातील रहिवासी विद्यार्थ्यांकरिता वरील २५ टक्के जागांसाठी प्रवेश शुल्क सवलतीच्या दराने आकारण्यात येईल. ही सवलत २० टक्के दराने देण्याच्या देकार निविदेमध्ये अंतर्भूत केले आहे. या कॅम्पसमध्ये एकत्रित विद्यार्थी पटसंख्या ४०४० एवढी असेल. मनपाद्वारे १८.३५ हेक्टर जमिनीवर नर्सरीपासून ते प्री-प्रायमरी आणि बहु-विद्याशाखीय उच्च अभ्यासक्रम/कार्यक्रमापर्यंतचे शिक्षण देणारी संस्था निर्माण व्हावी याकतिरता सदर जागा रुपये १ प्रती चौरस फुट प्रती वर्ष या दराने शैक्षणिक संस्थेला भाडेपट्टयाने देण्यात आली आहे.