हजारो महिलांनी केला मतदानाचा जागर
दहाही झोनमध्ये मतदार जनजागृती रॅली
Date : 28 Oct 2024
भारत निवडणूक आयोगाचे ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ अर्थात स्वीप कार्यक्रम नागपूर शहरामध्ये यशस्वीरीत्या राबविण्याच्या दृष्टीने नियोजित मिशन युवा व मिशन डिस्टींग्शन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे त्याचप्रमाणे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने नागपूर शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमा अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिका अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ११८ वस्ती स्तरीय संस्थांची २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सभा घेण्यात आली. त्याअनुषंगाने २८ ऑक्टोबर २०२४ रोजी १० झोन अंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढावी व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर जनजागृती कार्यक्रमात झोन मधील सहायक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी व बचत गटातील ११८ वस्ती स्तरीय संघातील १०,००० महिलांनी सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे नागरिकांना मतदान करण्याविषयी संदेश देऊन जागरूक करण्यात आले. मतदाराचा संकल्प म्हणून सर्व सहभागी यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रम अतिरिक्त आयुक्त (सामान्य) नोडल अधिकारी (SVEEP) मनपा श्री. अजय चारठणकर आणि उपायुक्त (सविवि) सहायक नोडल अधिकारी (SVEEP) डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर शहरातील सर्व नागरिकांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजाविण्याबाबत आवाहन केले आहे.
पाणी बिलावरूनही मतदार जनजागृती
मतदार जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मनपाद्वारे घरोघरी देण्यात येणाऱ्या पाणी बिलावरूनही जनजागृती करण्यात येत आहे. मनपाच्या पाणी बिलावर मतदार जनजागृतीचा संदेश देणारी जाहिरात करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला शहरातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे व शंभर टक्के मतदान व्हावे या हेतूने मनपाद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे.