वाठोडा चार्जिंग स्टेशनची आयुक्तांनी केली पाहणी
१५० बसेसच्या चार्जिंगची सुविधा सज्ज
Date : 14 Nov 2024
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, परिवहन व्यवस्थापक श्री. विजय जाधव, व्यवस्थापक प्रशासन श्री. विकास जोशी, व्यवस्थापक ऑपरेशन श्री. राजीव घाटोळे, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन प्रा.लि.चे अध्यक्ष श्री.सी.के. गोयल उपस्थित होते.
१५व्या वित्त आयोगातून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्र शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला १४४ नवीन ई-बस देण्यात आलेल्या आहेत. यापैकी ८६ बसेस ‘आपली बस’ सेवेमध्ये तैनात आहेत. या बसेससाठी वाठोडा येथे १०.६ एकर जागेमध्ये डेपो आणि चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे. या बसेसच्या संचालनाची जबाबदारी पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन प्रा.लि. यांचेकडे देण्यात आली आहे. पीएमआय मार्फत या जागेवर १५० बसेसच्या पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चार्जींगसाठी २२ स्टेशन तयार करण्यात आले असून यावर एकावेळी ४४ बसेसची चार्जींग करण्याची सुविधा आहे. या संपूर्ण परिसराची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली.
वाठोडा डेपो आणि चार्जिंग स्टेशनमध्ये प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण परिसरामध्ये देखील प्रकाश व्यवस्था करणे, बसेसची सर्व्हिसींग करण्यासाठी निर्माण करण्यात येत असलेले बांधकाम, चालकांसाठी बसण्याचे शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन प्रा.लि.द्वारे वाठोडा डेपो आणि चार्जिंग स्टेशनमध्ये सुविधांबाबत सुरू असलेल्या कामांबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी परिवहन विभागाचे स्थापत्य उपअभियंता श्री. केदार मिश्रा, यांत्रिकी अभियंता श्री. योगेश लुंगे, प्रकल्प सल्लागार श्री. मेहुल रानडे, पीएमआय चे उपाध्यक्ष श्री. प्रवीण श्रीवास्तव, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. अमरदीप शर्मा, डेपो व्यवस्थापक श्री. अभिजीत नलावडे उपस्थित होते.