नागरी तक्रारी प्राधान्याने सोडविण्याच्या दृष्टिने मनपा आयुक्तांची सीओसीला भेट
नागरी तक्रारी संदर्भात सक्रियतेने कार्यकरण्याचे दिले निर्देश
Date : 29 Nov 2024
नागपूर महानगरपालिकेला प्राप्त नागरी तक्रारी प्राधान्याने सोडविण्याच्या दृष्टिने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी (ता:29) मनपा मुख्यालयातील नागपूर स्मार्ट सिटीच्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर अर्थात सीओसी येथे भेट दिली. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त श्री प्रकाश वराडे, मनपाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे श्री. स्वप्नील लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर महानगर पालिकेला एका वर्षात प्राप्त तक्रारींची माहिती जाणून घेतली. गत वर्षभरात मनपाला 26,111 तक्रारी विविध माध्यमांवरून प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. यात मनपाच्या वेबसाईट वरून 15,735 तक्रारी प्राप्त झाल्यात तर, मनपाच्या 'माय नागपूर' अँपच्या माध्यमाने 7,453 तक्रारी, उद्यान संदर्भात 209 तक्रारी व विविध समाज माध्यमांवरून 2,714 तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सादर करण्यात आली. प्राप्त तक्रारी मधून 25,401 तक्रारी सोडविण्यात आल्या, तर 232 तक्रारींवर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आयुक्त डॉ.चौधरी यांना देण्यात आली.
मनपातर्फे तक्रारींचे निवारण करण्याकरिता विशिष्ट कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. नागरी तक्रारी संदर्भात नागरिकांचे अभिप्राय घेऊन त्याद्वारे प्रणालित बदल करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी दिल्या. तसेच मनपाद्वारे लवकरच नागरी समस्यांचे वेळीत निराकरण करण्याच्या दृष्टिने कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असून, टोल फ्री क्रमांक 155304 हा हेल्पलाईन क्रमांक कॉल सेंटर साठी असणार आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. चौधरी यांनी तातडीने कार्य पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.