संविधानावर आधारित चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती
दहाही झोनमध्ये अभियानाला उदंड प्रतिसाद
Date : 30 Jan 2025
भारतीय संविधानाबाबत जागरुकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबद्दल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सवाची नागपूर शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे संविधान चित्ररथ तयार करण्यात आले असून त्या माध्यमातून २७ जानेवारीपासून दररोज शहराच्या विविध भागात मनपा झोननिहाय जनजागृती केली जात आहे. याच श्रृंखलेत गुरुवारी (ता. ३०) सकाळी १० ते १२ दरम्यान सतरंजीपुरा व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत लकडगंज झोन येथे हे अभियान राबविण्यात आले.
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी समाजकल्याण विभाग नागपूर यांचेद्वारे भारतीय संविधानावर आधारित आकर्षक चित्ररथ तयार करण्यात आले होते. त्याच चित्ररथाच्या माध्यमातून मनपातर्फे २७ जानेवारीपासून शहराच्या विविध भागात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. आतापर्यंत लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरू नगर व गांधाबाग या झोनमध्ये जानजागृती अभियान रावण्यात आले आहे. ३० रोजी सतरंजीपुरा झोन अंतर्गत येत असलेल्या विट भट्टी, पारडी उड्डाण पूल, ऑटोमोटिव्ह चौक येथे सकाळी १० ते १२ दरम्यान चित्र रथ फिरवून जनजागृती करण्यात आली. तसेच सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान लकडगंज झोन अंतर्गत कच्छी विसा मैदानात जनजागृती अभियान राबवण्यात आले.