धरमपेठ झोनमध्ये स्वच्छता मॅरेथॉन दौड
स्वच्छते प्रति जनजागृतीसाठी पुढाकार : मनपा व प्रहार मिलिटरी स्कूलचे आयोजन
Date : 31 Jan 2025
नागपूर शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका आणि प्रहार मिलीटरी स्कूल यांच्याद्वारे पुढाकार घेण्यात आला. यातून ३ किमी अंतराची स्वच्छता मॅरॅथॉन दौड घेण्यात आली. कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ जीवनशैलीला प्रोत्साहित करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले.
३ किलोमीटरच्या स्वच्छता मॅरॅथॉन दौडमध्ये प्रहार आर्मी स्कूल, मनपा वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा, सरस्वती स्कूल आणि तायडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. कार्यक्रमात प्रहार मिलिटरी स्कूलचे उपप्राचार्य श्री भालचंद्र कागभट, धरमपेठ झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी श्री दिनदयाल टेंभेकर, महानगरपालिकेतील आयईसी पथकाचे सदस्य आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
प्रहार मिलिटरी स्कूलचे उपप्राचार्य श्री भालचंद्र कागभट आणि धरमपेठ झोन मुख्य स्वच्छता अधिकारी श्री दिनदयाल टेंभेकर यांनी हिरवी झेंडी दाखवून स्वच्छता मॅरॅथॉन दौड चा शुभारंभ केला. मॅरॅथॉनमध्ये भाग घेणारे विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आपल्या प्रतिभेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यावेळी दौडमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या स्पर्धकांना मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.