मनपाच्या शालेय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
आमदार प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, आंतरराष्ट्रीय खेळाडू राजू गायकवाड, शुभम पालकर यांची उपस्थिती
Date : 03 Feb 2025
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार श्री. दटके यांनी, मनपा शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याकरिता शिक्षण विभागाचे कौतुक केले. ते म्हणाले की, एकेकाळी मनपाच्या क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी गर्दी होत होती. ही परंपरा परत सुरु होत असल्याने आनंद होत आहे. त्यांनी मध्य नागपुरातील बंद पडलेल्या शाळांना सुरु करण्यासाठी आमदारनिधी मधून निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. राजू गायकवाड आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्यात.
यावेळी क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, आकांक्षा संस्थेचे संचालक श्री सोमसूर्व चॅटर्जी, सहायक शिक्षणाधिकारी श्री सुभाष उपासे, श्री संजय दिघोरे, श्री विनय बगले, श्रीमती अर्चना भोतमांगे उपस्थित होते. सर्वप्रथम हॉकीचे जादूगर स्व.ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तिरंगा रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका श्रीमती मधू पराड यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेद्वारे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात ‘शिक्षणोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार आणि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाल येथील चिटणीस पार्क येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता तर ५ ते ७ फेब्रुवारी २०२५ रोजी धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिटणीस पार्क नागपूर येथे सकाळी मशाल दौडने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मनपा आकांक्षा इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थांनी मुख्य अतिथींना एस्कॉर्ट करून व्यासपीठावर आणले. यानंतर सर्वांनी क्रीडा प्रतिज्ञा (sports pledge) घेतली. क्रीडा स्पर्धांमध्ये मनपा शाळेतील इयत्ता १ ते ५चे जवळपास ७९५ विद्यार्थांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. सोमवारी ५० मी दौडमध्ये ८० शाळेचे विद्यार्थी भाग घेतला तसेच बुक बॅलेन्समध्ये ५८ शाळेचे विध्यार्थ्यानी भाग घेतला. ऑब्स्टॅकल दौडमध्ये ५४ शाळेचे विद्यार्थी, तीन पायाची दौडमध्ये २९ शाळेचे विद्यार्थी, स्टिक बॅलेन्समध्ये २५ शाळा, सॅक रेसमध्ये ५६ शाळा, रोलर टॅंकमध्ये ४८ शाळांनी भाग घेतला. ४ फेब्रुवारी रोजी मुलांची कबड्डी व मुलींची लंगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
५ ते ७ फेब्रुवारी रोजी यशवंत स्टेडियमला इयत्ता ६ ते ८ आणि ९ ते ११ वी च्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील. यावेळी रस्सी खेच (१० ते १५ टीम मेंबर), १०० मी दौड, शॉट पुट, डिस्क थ्रो, खो-खो हे खेळ ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील. कबड्डी, व्हॅलीबॉल, लंगडी, क्रिकेट हे खेळ ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील तर फुटबाँल, कॅरम आणि चेस हे खेळ ७ फेब्रुवारीला घेण्यात येतील. शिक्षणोत्सव कार्यक्रमाचा समारोप १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये होणार आहे.