महापालिकेच्या स्थावर मालमत्तांची होणार डाटा बँक
शहरातील विविध मालमत्तांचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जिओ-मॅपिंग
Date : 25 Mar 2025
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नुकत्याच सादर केलेल्या महापालिकेच्या अर्थसंकल्पातील भाषणात या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. नागपूर महापालिकेच्या मालकीचे एकूण २२ अभिन्यास आहेत. यात भूखंडांची एकूण संख्या ३८२२ एवढी आहे. त्याचप्रमाणे शाळा, समाजभवन, वाचनालये, दवाखाने, व्यायामशाळा, खुले मैदान, उद्याने, स्मशानघाटन, अग्निशमन केंद्रे, परिवहन डेपो व नगररचना विभागातर्फे हस्तांतरीत झालेल्या खुल्या जागांसह महापालिकेच्या मालकीच्या १०३९ स्थावर मालमत्ता आहे.
याशिवाय मौजा वाठोडा, भांडेवाडी, तरोडी (खुर्द) व बिडगाव येथील एकूण ४५५.८६ एकर जागा आहे. तसेच शहरातील सुरेश भट सभागृह, टाऊन हॉल, महाल भागातील विभागीय कार्यालय आहे. महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या २२ अभिन्यासाची ३० वर्षांच्या भाडेपट्टीवर दिलेल्या भूखंडांची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण करून देणे, भूखंडांचे नामांतरण, बांधकाम व शुल्क वसुल करून उत्पन्नात वाढ केली जाणार आहे.
महापालिकेच्या मालमत्तांपैकी काही अभिन्यास १९१० पासून भाडेपट्टीवर दिलेले आहे. या अभिन्यासाच्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी महापालिकेच्या एकूण स्थावर मालमत्तांची डाटा बँक तयार करण्याचे या अर्थसंकल्पात नमूद केले आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार असून जिओ-मॅपिंग, जिओ-टॅगिंग, जिओ-फेन्सिंग इत्यादी कामे केली जाणार आहेत. महापालिकेच्या स्थावर मालमत्तांचा संपूर्ण अभिलेखाचे संगणीकृत केला जाणार आहे. त्याचप्रमाणे भाडेपट्ट्यांवर दिलेल्या भाडेपट्टाधारकांना सुलभ सेवा व सेवा पुरविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने विविध कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेने भाडेपट्टीवर दिलेल्या स्थावर मालमत्तेच्या भाडेपट्टीतून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात १०.९५ कोटी रुपये उत्पन्न महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे.