लाड-पागे समिती अंतर्गत २०५ वारसदार मनपामध्ये नियुक्तीस पात्र
झोननिहाय वारसदारांच्या नावाची यादी होणार प्रकाशित
Date : 26 Mar 2025
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती संदर्भात वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या परिपत्रकाच्या अनुषंगाने तसेच लाड व पागे समितीने सफाई कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत सफाई कामगारांच्या वारसदारांना लाड समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
बुधवारी (ता.२६) या समितीची बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्रीमती विजया बनकर, विधी अधिकारी श्री. प्रकाश बरडे, सहा. आयुक्त श्री.श्याम कापसे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये झालेल्या चर्चे उपरांत गठित समितीने एक मताने एकूण २०५ वारसदारांना नियुक्तीकरिता पात्र ठरविले आहे. पात्र ठरिवण्यात आलेल्या वारसदारांच्या नावावर नियुक्ती देण्यापुर्वी आक्षेप व हरकती मागविण्याकरिता मनपा मुख्यालय व दहाही झोन कार्यालयांमध्ये २०५ वारसदारांच्या नावाची यादी प्रकाशित करण्यात यावी. प्रकाशित करण्यात आलेल्या वारसदारांच्या नावावर जे काही आक्षेप व हरकती प्राप्त होतील त्यांच्या निराकरण करुन अंतिम यादी पोलिस मुख्यालय, विशेष शाखा, नागपूर शहर यांना पाठवून संपूर्ण २०५ वारसदारांची चारित्र्य पडताळणी प्राप्त करुन घ्यावी, असे निर्देश यावेळी मनपा आयुक्तांनी दिले.
डॉ. अभिजीत चौधरी,आयुक्त तथा प्रशासक यांचे अध्यक्षतेखाली गठित समितीने यापुर्वी २० सप्टेंबर २०२४ रोजी आदेशान्वये एकूण ३०२ सफाई कामगारांच्या वारसदारांची नियुक्ती देण्यात आली आहे.