जलपर्णीपासून तयार होणार इकोफ्रेंडली वस्तू
महापालिकेचा अभिवन उपक्रम शंभर महिलांना मिळणार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
Date : 27 Mar 2025
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी (ता. 21 मार्च) सादर केलेल्या अर्थसंकल्पात जलपर्णी पासून हस्तशिल्प व रोजगार निर्मितीसाठी 33.07 लक्ष निधीची तरतूद केली आहे. जलपर्णी कापून यातून पर्यावरणस्नेही वस्तूंची निर्मिती करण्याचा उपक्रम राबविण्याचा मानस महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला आहे. या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी जलपर्णीपासून टोपली, कागद कार्डबोर्ड, टोपी, चटई, फर्निचर पॅकिंगचे कागद तसेच ज्यूट सोबत मिळून दोरखंड इत्यादी वस्तू तयार करता येतात.
नागपूर महानगरपालिकने सकारात्मक दृष्टिकोनातून बघत जलपर्णीपासून इकोफेंडली अशा विविध वस्तू तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. जलपर्णीपासून वस्तू तयार करण्याकरिता महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या जलपर्णीपासून सुंदर बास्केट, विविध आकारातील पर्स, चटई, योगा मॅट, टोपी, टी कोस्टर अशा 200 वस्तूंची निर्मिती केली जाणार आहे.
पारडी येथे कौशल्य प्रशिक्षण
अंबाझरी तलावापासून निघणाऱ्या जलपर्णीपासून विविध वस्तू तयार करण्याकरिता पुनापूर पारडी येथील नागपूर स्मार्ट सिटी तर्फे बांधण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रात 100 महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात दोन प्रकारात प्रशिक्षण दिले जाणार असून लुम मशीनद्वारे वस्तू तयार करण्यासाठी 50 महिलांना आणि रोलर मशीनद्वारे वस्तूंची निर्मिती करण्यासाठी 50 महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जलपर्णीद्वारे हस्तशिल्प व रोजगार निर्मिती प्रकल्प सुरु करण्याकरीता 33.07 लक्ष निधीची तरतूद अर्थंसंकल्पात केली आहे.
महिला बचत गटांना काम
जलपर्णी कापण्याकरिता राज नालंदा वस्तीस्तर संस्थेअंतर्गत स्थापित महिला बचत गटांना कामे दिले आहे. यात भिमाई महिला बचत गट, पंचशील महिला बचत गट, आर्या महिला बचत गट, सावित्रीच्या लेकी महिला बचत गट, लक्ष्मी महिला बचत गट, वैष्णवी महिला बचत गट यांना परवानगी देण्यात आली आहे.