नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक
वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
Date : 28 Mar 2025
मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्तांच्या सभाकक्षामध्ये आयोजित टास्क फोर्स समितीच्या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, मनपा साथरोग अधिकारी डॉ गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. वर्षा देवस्थळे, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. अतीक खान, डॉ. अश्विनी निकम, पीएचएन अर्चना खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) डॉ. शिल्पा नेर्लिक्कल, मध्य रेल्वे हॉस्पीटलच्या मंजूषा माटे, डॉ. अनूपमा मावळे यांच्यासह लसीकरण क्षेत्र सनियंत्रक व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याद्वारे १०० दिवसीय विशेष लसीकरण मोहिम राबविली जात आहे. यासंदर्भात देखील बैठकीत आढावा घेण्यात आला. प्रारंभी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी लसीकरण मोहिमेतील आकडेवारी सादर केली.
नवजात बालकांपासून ते ५ वर्षापर्यंत बालकांना तसेच गरोदर मातांना विविध प्रकारचे लसीकरण केले जाते. या लसींपासून कुणीही माता आणि बालक वंचीत राहू नये हे मनपाचे उद्दिष्ट आहे. यासाठी मनपाद्वारे विशेष फिरते लसीकरण वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे वाहन प्रत्येक महिन्यात दर दोन दिवस प्रत्येक झोनमध्ये कार्य करते. बांधकाम स्थळे, झोपडपट्टी भागांमध्ये जाऊन तेथील पात्र बालकांना लसीकरण केले जाते. जास्तीत जास्त ठिकाणी जाऊन वंचित बालकांचे लसीकरण करण्याची गती वाढविणे, झोन अंतर्गत खासगी प्रसूतीगृहांमध्ये जन्म झालेल्या बालकांची माहिती घेणे तसेच नियमित त्या प्रसूतीगृहांच्या संपर्कात राहण्याचे निर्देश यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिले. झोनमधील लसीकरणाच्या विविध हायरिस्क भागामध्ये झोनमल वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्याची नोंद 'गूगल फॉर्म' करावी व दर सात दिवसांनी त्याचा अहवाल सादर करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.
लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांची एक यादी तयार करून त्यांचे लसीकरण करण्यात यावे. ज्या भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करावी, गरजेनुसार नागरिकांचे समुपदेशन करावे, लसीकरणासाठी आशा अंगणवाडी सेविकांचे सहकार्य घ्यावे, आदी सूचना जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद म्हणाले. त्यांनी लसीकरणाबाबत कृती आराखडा (ऍक्शन प्लान) तयार करण्याची देखील सूचना केली. झोन तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रशिक्षण, घरोघरी जाऊन करावयाचे सर्वेक्षण याबाबत देखील झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
बैठकीत लसीकरण क्षेत्र सनियंत्रक संदीप फुंडे, प्रमोद डहाट, मोनाली बावनकर, सोनल सियाग, सोनाली गावडे आदी उपस्थित होते.