भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील आणखी २१ एकर जागा होणार मोकळी
१० लाख टन कचऱ्याची लागणार विल्हेवाट
Date : 28 Mar 2025
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नुकताच २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याची विल्हेवाट लावून येथील जागा मोकळी करण्याचा संकल्प व्यक्त केला.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मान्यतेनुसार नागपुरातील भांडेवाडी मधील जागा कचरा डम्पिंगसाठी व कचरा प्रक्रियेसाठी सुनिश्चित केली गेली आहे. येथे शहरातील संपूर्ण कचऱ्याचे संकलन करून त्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व तेथील जागा स्वच्छ आणि मोकळी राहावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायोमायनिंग प्रकल्प राबविला जात आहे. भांडेवाडी बिडगाव रोड येथील ५५ एकर जागा सन २०१९ पर्यंत ही कचऱ्याने संपूर्ण भरलेली होती तेथे प्रक्रिया न झालेला २० लक्ष मेट्रिक टन कचरा साठवून ठेवण्यात आला होता. नागपूर महानगरपालिकेने स्वखर्चाने या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रकल्प राबविला व संपूर्ण ५५ एकर जागा मोकळी केली. मनपातर्फे आता भांडेवाडीमध्ये अनेक वर्षांपासून साठलेल्या १०.५ लक्ष टन कचऱ्याची विल्हेवाट लावून २१ एकर जागा मोकळी केली जाणार आहे. हे काम वर्ष २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा मनपाचा मानस आहे.
यापूर्वी नागपूर महानगरपालिकेद्वारे मोकळी करण्यात आलेल्या ५५ एकर जागेमध्ये विविध पर्यावरण प्रकल्प राबविले जात आहेत. जसे बांधकाम आणि पाडाव (Construction and Demolition) कचरा प्रक्रिया केंद्र, वेस्ट टू एनर्जी अंतर्गत १००० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचे सीबीजी प्लँन्ट उभारणे, एसएलएफ चे बांधकाम, मियावाकी पर्यावरणीय प्रकल्प इत्यादी, यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्पाचे बांधकाम कार्य सुरु झाले आहे त्याकरिता जागा सुनिश्चित करण्यात आली आहे. मोकळ्या झालेल्या ५५ एकर जागेपैकी ३० एकर जागा घनकचरा प्रक्रियेसाठी देण्यात आली आहे. तर ५ एकर जागेवर सी ॲण्ड डी वेस्ट प्रक्रिया प्रकल्प सुरु आहे. १८०० चौ.मी. जागा मृत प्राण्यांच्या दहन प्रक्रियेसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. उर्वरीत जागेपैकी ३ एकर जागेवर दफन भूमी व प्राण्यांसाठी निवारागृह तसेच प्रक्रियेकरिता आणि अंतर्गत रस्त्यांकरिता प्रस्तावित करण्यात आली आहे.