राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालय, विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे केंद्र
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
Date : 03 Jul 2025
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या नेतृत्त्वात आणि शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ग्रंथालय अधीक्षक श्रीमती मंजुषा कन्हेरे यांच्या देखरेखीखाली महानगरपालिकेची ग्रंथालये अधिकाधिक अभ्यास केंद्रे म्हणून विकसित केली जात आहेत. या ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली आहे. सुरवातीला चिटणवीसपुरा येथे नागरिकांसाठी केवळ वृत्तपत्र वाचनालय उपलब्ध होते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणतीही सुविधा नव्हती, ही अडचण लक्षात घेऊन महानगरपालिकेने राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या ई-ग्रंथालयाचे लोकार्पण १ एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, मा. आमदार श्री. प्रवीण दटके व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.
ई-ग्रंथालयाचे लोकार्पण झाल्यापासून अवघ्या दोन वर्षांत या ई-ग्रंथालयाने मोठी झेप घेतली आहे. या ग्रंथालयातून अभ्यास करून ५ विद्यार्थी सीए बनले आहेत, तर ४ विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी यशस्वी झाले आहेत. याव्यतिरिक्त, ४ विद्यार्थ्यांची बँकेत निवड झाली आहे.. सध्या मेयो आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी ही या ग्रंथालयाला अभ्यासासाठी अधिक पसंती देत असतात. याव्यतिरिक्त, यूपीएससी, एमपीएससी, बँक, रेल्वे, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या लायब्ररीचा मोठा फायदा होत आहे.
संगणक व इंटरनेटची सुविधा
मनपा ग्रंथालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शिस्तीसाठी कडक नियम तयार केले आहेत. अभ्यासिकेचा उपयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रतिमाह ३०० रुपये आणि संगणक-इंटरनेटचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रतिमाह ५०० रुपये शुल्क आकारले जाते. ग्रंथालयात शांततेने अभ्यास करतील अशाच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी दिली जात असल्याची माहिती ई-ग्रंथालयाचे प्रभारी श्री. संजय सुनेरी यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे स्थानिक आणि राष्ट्रीय वृर्तमानपत्र देखील उपलब्ध आहेत.
ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र
नागपूर महानगरपालिकेने चार मजली इमारत बांधली असून, त्यात विविध सुविधा उपलब्ध आहेत. पहिला मजल्यावर कार्यालय, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आणि वृत्तपत्र वाचनालय कक्ष आहे. येथे ज्येष्ठ नागरीक वाढदिवस साजरा करतात. यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
मुला-मुलींसाठी खास अध्ययन कक्ष
राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयात मुले आणि मुलीसाठी अभ्यासासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तिसऱ्या मजल्यावर मुलींसाठी अध्ययन कक्ष आणि ई-ग्रंथालय उपलब्ध आहे. जवळपास एकाच वेळी ३५ विद्यार्थ्यांसाठी आसन व्यवस्था आहे. तर चवथ्या मजल्यावर ३५ मुलांसाठी अध्ययन कक्ष आणि ई-लायब्ररी सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही अध्ययन कक्ष आणि ई-ग्रंथालयात दरदिवशी ७०च्यावर मुला-मुलींना अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-ग्रंथ्रालायात एकूण २२ संगणक उपलब्ध असून शुल्क देणाऱ्यांना सुविधा पुरवली जाते. मुलांकरीता अभ्यासिकेची सुविधा सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत, तर मुलींसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी ४९५ पुस्तके उपलब्ध आहेत. या ई ग्रंथालयात विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असल्याने ४०० विद्यार्थी ई-ग्रंथालयात प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत आहेत.