शहरातील झोन निहाय “सखोल स्वच्छता मोहिमेला” मिळाली नागरिकांची साथ
मनपाकडून शनिवारी विशेष सखोल स्वच्छता मोहिम -' स्वच्छता अपनाओ, बीमारी भगाओ' अभियान
Date : 05 Jul 2025
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या देखरेखित मनपाच्या दहाही झोन अंतर्गत सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या ऑरेंज सिटी स्ट्रीट, सहकारनगर परिसरातून मोहिमेची सुरुवात केली. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त श्री.गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. गजेंद्र महल्ले, लक्ष्मीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त श्री. सतीश चौधरी, झोनल अधिकारी श्री ऋषिकेश इंगळे, स्वच्छ भारत नागपूरचे ब्रँड अँबेसिडर व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे श्री. कौस्तव चॅटर्जी, गच्चीवरील माती विरहित बाग समूहाचे श्री. उमेश चित्रिव, स्वच्छता ब्रँड अँबेसिडर आरजे आमोद, श्री. विनय पटवर्धन यांच्यासह मनपाचे स्वच्छता कर्मचारी व उपद्रव शोध पथकाचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका शहर स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत नागरिकांनी देखील स्वच्छतेवरती भर द्यावा. व स्वच्छ झालेल्या ठिकाणी कचरा टाकू नये. याशिवाय नागरिकांनी आपल्या घरातून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून तो कचरा स्वच्छता दूतांकडे, कचरा संकलन वाहनामध्ये टाकावा, तसेच आपल्या परिसरात कचरा संकलन वाहन येत नसल्यास त्या संदर्भातील माहिती माय नागपूर व ग्रीव्हियन्स पोर्टलवर द्यावी याची नक्कीच दखल घेतल्या जाईल असे आवाहन श्रीमती वसुमना पंत यांनी केले.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी स्वतः विविध झोन मध्ये भेट देत मोहिमेची पाहणी केली. या मोहिमेअंतर्गत झोनमधील ठराविक परिसरांची साफसफाई, गवत कापणी, डेब्रिज उचलणे आणि संपूर्ण सखोल स्वच्छता करण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या ऑरेंज सिटी स्ट्रिट, सहकारनगर,धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या मेन रोड व बालोद्यान परिसर, हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या सोमवारी क्वार्टर आणि तुकडोजी पुतळा परिसर, धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या म्हाडा, शनिवारी व सुभाष रोड परिसर,नेहरुनगर झोन अंतर्गत येणाऱ्या जवाहर वस्तीगृह आणि हसनबाग परिसर, गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या संत्रा मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन जवळील परिसर, सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या भारत माता चौक ते तबला बाजार, मस्का साथ मार्गावरील परिसर, लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या मिनी मातानगर परिसर,आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या महेन्द्रनगर परिसर, मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या हसन गॅरेज, मोहन नगर रोड व परिसर येथे सखोल स्वच्छता करण्यात आली. मोहिमेसाठी दहाही झोनचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
५७.५ टन कचरा संकलित
विशेष म्हणजे, मोहिमेसाठी दहा जेसीबी, दहा टिप्पर, दोन मोठ्या गाड्या, सर्व जूनच्या कचरा संकलन वाहने तैनात करण्यात आल्या होत्या. स्वच्छता मोहिमेतून लक्ष्मीनगर झोन मधून ४ टन,धरमपेठ झोन मधून १ टन, हनुमान नगर झोन मधून झोन ५ टन, धंतोली झोन मधून १५ टन, नेहरूनगर झोन मधून १२ टन, गांधीबाग झोन मधून ८ टन, सतरंजीपुरा झोन मधून ४ टन, लकडगंज झोन मधून ४ टन, अशीनगर झोन मधून १ टन, मंगळवारी झोन मधून ३.५ टन असा एकूण ५७.५ टन कचरा संकलित करण्यात आला.
स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग
शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या सखोल स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वयमस्फूर्ततेने सहभाग घेतला.
तेजस्विनी महिला मंच मंचच्या श्रीमती किरण मुंदडा यांच्यासह ग्रीन व्हिजील फाउंडेशन व गच्चीवरील मातीविरत बाग समूह यांचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी ग्रीन व्हिजिलचे स्वयंसेवक कु . सुरभी जयस्वाल, श्री.मेहुल कोसुरकर, कु.शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे त्यांनी परिसराची स्वच्छता केली.