नागरी सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्या
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी संयुक्तपणे केली परिसराची पाहणी
Date : 16 Sep 2025
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मनपाद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी मंगळवारी (ता.१६) दीक्षाभूमी परिसराला येथे भेट दिली. यावेळी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, पोलीस उपायुक्त श्री. एच ऋषिकेश रेड्डी, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, , उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. राजेश भगत, मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. सतीश चौधरी, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर, नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता श्री. चिमूरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, श्री. विलास गजघाटे, मनपाचे विभागीय स्वच्छता अधिकारी श्री. लोकेश बासनवार, लक्ष्मीनगर झोनचे झोनल अधिकारी श्री. ऋषिकेश इंगळे यांच्यासह आदी उपस्थित होते.
नागपूरचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस उपायुक्त यांनी दीक्षाभूमी परिसराची पाहणी केली. येत्या २ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत. त्यानुसार ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिका द्वारा दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. लाखोंच्या संख्येत येणाऱ्या बौद्ध अनुयायांना आरोग्यपूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबाबत आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले. तसेच नासुप्रद्वारे दीक्षाभूमी परिसारत सुरू असलेल्या कार्याला गती देत लवकरात लवकर मैदान मोकळे करावे, असेही निर्देश आयुक्त यांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, माता कचेरी परिसर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), सामाजिक न्याय भवन परिसरातील पार्किंगच्या जागेवर शौचालयाची व्यवस्था व अन्य नागरी सुविधा या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. दीक्षाभूमी स्तूप, तसेच सर्व मार्ग आणि शौचालयांच्या ठिकाणी वीज पुरवठा निरंतर सुरू राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे तसेच प्रसाधनगृहांमध्ये वीज पुरवठ्यासोबतच निरंतर पाणी पुरवठा देखील ठेवणे आणि सर्व शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी हँडवॉशची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.
अनुयायांसाठी अशी आहे व्यवस्था...
Ø दीक्षाभूमी परिसरालगतच्या रस्त्यावर १२० नळा द्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
Ø सामाजिक संस्थेद्वारा देण्यात येणाऱ्या भोजनदानाच्या ठिकाणी 7 टँकरद्वारा पाणी पुरवठा
Ø विविध ठिकाणी ५ सिंटेक्स टँक ठेवून पाण्याची व्यवस्था .
Ø दीक्षाभूमी लगतच्या परिसरातील सर्व रस्ते स्वच्छ राखण्याकरीता तीन पाळीत एकूण 650 सफाई कर्मचारी नियुक्ती
Ø दीक्षाभूमी परिसरालगत कचरा टाकण्याकरिता 200 कचऱ्याच्या पेटयांची (ड्रम) व्यवस्था
Ø दीक्षाभूमी व लगतच्या परिसरात 1000 (Toilet Seats) अस्थायी शौचालय
Ø ७ फिरते शौचालय, साफ-सफाईसाठी तीन पाळीत एकूण 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
Ø ४ सक्शन कम जेटींग मशीनद्वारे शौचालयाची स्वच्छता
Ø महावितरण यांच्या समन्वयाने आवश्यक तेथे प्रकाश व्यवस्था
Ø दीक्षाभूमी परिसरात स्थायी ४० सी.सी.टी.व्ही कॅमेरे
Ø परिसराबाहेर गर्दीच्या ठिकाणी ८ अस्थायी कॅमेरे, १० जनरेटर व्यवस्था
Ø दीक्षाभूमी परिसरात ४६० पथ दिव्यांची अतिरिक्त प्रकाश व्यवस्था
Ø मनपाच्या परिवहन विभागाद्वारे सीताबर्डी रेल्वे स्टेशन, अजनी रेल्वे स्टेशन, गणेशपेठ बसस्थानक, मोरभवन शहर बसस्थानक ते दीक्षाभूमी, दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस येथे ये-जा करण्यासाठी बसेसची व्यवस्था
Ø पावसाच्या परिस्थीतीत दीक्षाभूमी जवळ असलेल्या मनपा शाळेच्या इमारतीमध्ये व जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयाकडून अधिगृहीत केलेल्या इतर शासकीय संस्थाच्या इमारती व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये निवाऱ्याची व्यवस्था
Ø दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूनी येणा-या प्रत्येक रस्त्यावरील चौकामध्ये मनपाद्वारे आरोग्य केंद्र, तसेच २४ तास अँब्युलंसची व्यवस्था
Ø दीक्षाभूमी परिसरात मुक्कामी येणाऱ्या अनुयायांसाठी विश्रांती करीता आय.टी.आय. परिसरात भव्य मंडप उभारून दिल्या जाणार आहे.