‘अॅक्युट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ चा शहरात शिरकाव
मेंदूज्वराची लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या : मनपा आरोग्य विभागाचे आवाहन
Date : 17 Sep 2025
‘अॅक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ (AES) या आजाराच्या ८ रुग्णांची नोंद नागपूर शहरात झालेली आहे. यातील ५ रुग्ण हे मध्यप्रदेशातील असून ३ रुग्ण नागपूर शहर (२) व ग्रामीण भागातील (१) आहेत. शहरात या रुग्णांची नोंद होताच सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात शहरात आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. याकरिता शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना ‘अॅक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’शी संबधित लक्षणे आढळल्यास तशी माहिती मनपा आरोग्य विभागाला देण्याची सूचना करण्यात आली आहे.
‘अॅक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ (AES) म्हणजे मेंदूला होणारी तीव्र जळजळ किंवा सूज, ज्याची लक्षणे अचानक तीव्र तापाने सुरू होतात. त्यात मानसिक अवस्थेत बदल (गोंधळ, चक्कर येणे), झटके येणे किंवा बेशुद्ध पडणे यांचा समावेश असतो. काहीवेळा व्यक्तीला बोलता येत नाही किंवा चालताना अडचण येऊ शकते. विशेषतः १५ वर्षाखालील मुलांना या आजाराचा जास्त धोका संभावतो. हा आजार विषाणू आणि इतर घटकांमुळे होतो. काहीवेळा या आजाराचे कारण मेंदूमध्ये कमी झालेल्या रक्तातील साखरेची पातळी (हायपोग्लाइसेमिया) असू शकते. एईएस हा एक गंभीर आजार आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका असू शकतो. मेंदूला सूज आल्याने मेंदूच्या स्टेमवर दबाव येतो, ज्यामुळे श्वसनक्रिया आणि रक्ताभिसरण थांबू शकते. एईएस ची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.