‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’चा मनपाद्वारे शहरात शुभारंभ
स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ ठरणार विकसित भारताचा आधार
Date : 17 Sep 2025
मनपाच्या नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते श्री. तानाजी वनवे, माजी उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, नेहरूनगर झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन पवाने, नंदनवन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेयस खेमुका, माधव नेत्रालयाचे संचालक श्री. सुधाकर गोखले, श्री. किशोर कुंभार, श्री. राजेंद्र भोयर आदी उपस्थित होते.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचा मुख्य उद्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करणे आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या या अभियाना अंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या १६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांसाठी मनपाला एम्स नागपूर, आयएमए, भारतीय प्रसूती आणि स्त्रीरोग संस्था महासंघ (FOGSI), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, माधव नेत्रालय, ,एचसीजी कॅन्सर इन्स्टिट्यूट यासह इतर हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संस्थांचे सहकार्य आहे. नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील शिबिरामध्ये २५५ महिलांनी नोंदणी केली. मनपाच्या आरोग्य चमुसह मनपा दंत रुग्णालय सदर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चे मानसोपचार तज्ञ व त्वचा रोग तज्ञ, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे तज्ञ, माधव नेत्रालयचे तज्ञांनी संबधित रुग्णांची तपसणी केली. याशिवाय कुष्ठरोग विभाग, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागपूर शहर पूर्व द्वारे पोषण याबाबत जनजागृती करण्यात आली. शिबिरामध्ये भाऊसाहेब मुळक नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. मनपाच्या आशा सेविकांद्वारे ९५ महिलांचे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना कार्ड तयार करण्यात आले. शिबिरात ५ जणांनी रक्तदान केले. क्षयरोग विभागाद्वारे ३० महिलांचे एक्स रे काढण्यात आले. १०७ महिलांची नेत्र तर ५९ महिलांची दंत तपसणी करण्यात आली.
या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. यामध्ये महिलांचे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या निदानासाठी तपासणी, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठीची तपासणी केली जाते. जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन करण्यात येते. गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी व समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन आणि बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण केले जाते. आयुष सेवा च्या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्द व नॅचरोपॅथी इत्यादी पर्यायी उपचार पध्दतींची सेवा गरजू रुग्णांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्र घेण्यात येतात. क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषक आहार उपलब्ध करुन देण्यासाठी आणि क्षयरोगाविरुध्द जन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दानशुर व्यक्ती, संस्था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात असंसर्गजन्य आजार व अवयव दान बाबत शपथ देखील घेण्यात आली.