पुढील वर्षी मनपा सुरू करणार इंग्रजी माध्यामाच्या ७ शाळा
2026-27 शैक्षणिक सत्रापासून नर्सरीपासून मिळणार प्रवेश
Date : 18 Sep 2025
‘फुल स्कूल मॅनेजमेंट विथ प्रायव्हेट पार्टनर टिचर मॉडेल’ (FSMPT MODEL) या तत्त्वावर मनपाच्या बंद पडलेल्या शाळेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेशी संलग्न असलेल्या या शाळा सुरु होणार आहे. या शाळांमुळे झोपडपट्टी तसेच गरीब मुलांना इंग्रजी शिक्षणाची संधी मिळणार आहे. या शाळा स्वयंसेवी संस्था व मनपाच्या संयुक्त विद्यमाने संचालित केल्या जाणार आहेत. यासाठी नागपूर महानगरपालिकेने निविदा मागविल्या आहेत. .
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातील गरीब विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेऊन इतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकतील यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी इतर शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यात कुठेही मागे राहू नये, या हेतूने मनपाद्वारे 2021 साली आकांक्षा फाउंडेशन च्या सहकार्याने विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी एक, अशा सहा शाळा सुरू सुरु केल्या आहेत. यामध्ये बाभुळबन मनपा प्राथमिक शाळा, गरोबा मैदान (पूर्व नागपूर), रामनगर मनपा प्राथमिक शाळा, रामनगर (पश्चिम नागपूर), स्व. बाबुराव बोबडे मनपा प्राथमिक शाळा, चिंचभवन वर्धा रोड (दक्षिण-पश्चिम नागपूर), स्व. गोपालरावजी मोटघरे (खदान) मनपा प्राथमिक शाळा, रामभाऊ म्हाळगीनगर मनपा प्राथमिक शाळा, म्हाळगीनगर (दक्षिण नागपूर), राणी दुर्गावती मनपा प्राथमिक शाळा, राणी दुर्गावती (उत्तर नागपूर) अशा सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश आहे. या सर्व शाळा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाशी संलग्नित आहेत. नागपूर महानगरपालिकेतर्फे आकांक्षा फाऊंडेशनच्या सहकार्याने चालविण्यात येत असलेल्या शाळेत एकून 1842 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्षी या सर्व शाळांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
सन 2025-26 च्या शैक्षणिक सत्रापासून आकांक्षा फाऊंडेशनच्या सहकार्याने राय बहादुर गोवर्धनदास गोपीकिशन राजाराम (अग्रवाल) आरबीजीजीआर(ए) बिजली नगर, सदर येथे नवीन इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात आली आहे. नवीन शाळेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, यांनी मनपाच्या बंद पडलेल्या शाळांना भेटी दिल्या. या भेटीत बंद पडलेल्या शाळेत वर्गखोल्या, मैदान, आणि लगतच्या भागात आर्थिक दुर्बल घटकांची वस्ती असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर इंग्रजी शाळेबाबतचा प्रस्ताव मनपा आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानुसार यांनी शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
या नवीन शाळांचे प्रस्ताव
नारा एनएमसी स्कूल, नारा वस्ती (उत्तर नागपूर), बस्तरवारी एनएमसी स्कूल, दही बाजार (पूर्व नागपूर), अजनी पूर्व समर्थनगर एनएससी स्कूल (दक्षिण-पश्चिम नागपूर), धंतोली एनएमसी स्कूल(दक्षिण-पश्चिम नागपूर), दाभा एनएमसी प्रायमरी स्कूल, दाभा, (पश्चिम नागपूर), यशवंतराव चव्हाण एनएमसी स्कूल, सोमवारी क्वॉटर (दक्षिण नागपूर), महात्मा फुले हिंदी एनएमसी स्कूल, क्वॉटन मार्केट (मध्य नागपूर) या शाळांचा समावेश आहे. या शाळांच्या इमारतींची डागडुजी , पेंटिग, दार खिडक्यांची सुधारणा आणि नवीन डेस्क-बेंच यासारख्या सुविधा दिल्या जाणार आहे.
2026-27 या शैक्षणिक वर्षापासून या बंद पडलेल्या शाळेत स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘फूल स्कूल मॅनेजमेंट विथ प्रायव्हेट पार्टनर टिचर मॉडेल’ (FSMPT MODEL) या तत्त्वावर इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करण्यात येणार आहे. या शाळेत केजी-1 आणि केजी-2 चे वर्ग सुरु होणार आहे. पुढे टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत शिक्षण दिले जाणार आहे. नागपूर महानगरपालिकेने घेतलेला हा निर्णय शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र परिवर्तन घडवणारे ठरणार आहे.
प्रतिक्रिया….
‘मनपाच्या बंद पडलेल्या शाळेत गोर गरीबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याकरीता मनपा प्रशासनाकडून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात येणार आहे. जून 2026 या शैक्षणिक सत्रापासून या नव्या सात शाळा सुरू होतील, अशी माहिती मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी दिली.’