मनपाच्या निःशुल्क स्तन कर्करोग तपासणी शिबिराचा शुभारंभ
१३ नोव्हेंबरपर्यंत दहाही झोनस्तरावर शिबिरांचे आयोजन
Date : 01 Nov 2025
हिवरी नगर आरोग्य केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, लकडगंज झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, शिबिराच्या नोडल अधिकारी डॉ. अश्विनी निकम, एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मंगेश पाटील, रोटरी क्लब नागपूर नॉर्थचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे, असिस्टंट गव्हर्नर पराग घुबडे, अध्यक्ष विनय दारा, सचिव स्वप्नील बंड, डायरेक्टर श्याम वाधवानी, नंद ताहिलानी, अनिल नागवाणी, पंकज उपाध्याय आदी उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मनपाच्या दहाही झोनस्तरावर हे शिबिर आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांकरिता सर्व वैद्यकीय तपासणी सहायता एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्री नीता राजवार यांच्या नेतृत्वात हॉस्पिटलची वैद्यकीय चमू करीत आहे.
यावेळी बोलताना मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी शिबिरांची पार्श्वभूमी विशद केली. ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यामध्ये जनजागृती करण्याची संकल्पना रोटरी क्लब नागपूर नॉर्थचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या मनपा आयुक्तांसोबतच्या भेटीत पुढे आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मनपासह सर्व शासकीय इमारतींवर गुलाबी रंगाची लक्षवेधक रोषणाई करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात यात एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूरचे सहकार्य घेण्यात आले व त्यांच्या सहकार्याने ३० वर्षावरील महिलांकरिता स्तन कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्याची संकल्पना पूर्णत्वास आली. या शिबिरामुळे महिलांना पुढील धोका ओळखता येईल. तपासणीमध्ये कर्करोगाचे निदान झाल्यास शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार देखील करण्याची व्यवस्था आहे. या संपूर्ण अभियानामध्ये आशा स्वयंसेविकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गोरगरीब, गरजू महिलांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या करिता आशा सेविका घरोघरी भेट देऊन जनजागृती करीत आहेत, असे यावेळी डॉ. सेलोकर म्हणाले.
एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मंगेश पाटील यांनी महिलांनी दर महिन्याला 'सेल्फ ब्रेस्ट स्क्रिनिंग' करण्याबाबत आशांनी जागरूक करण्याचे आवाहन केले. रोटरी क्लब नागपूर नॉर्थचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ज्ञानेश्वर शेवाळे यांनी आरोग्य सेवेमध्ये रोटरी क्लबने केलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील बंड यांनी केले.
शनिवारी हिवरी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिबिरामध्ये १११ महिलांची तपासणी करण्यात आली. हिवरी नगर केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दक्षता गडपायले, डॉ. स्वाती थोरे यांच्यासह एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूरच्या वैद्यकीय चमूने शिबिरामध्ये तपासणी केली.