हॉट मिक्स प्लांटतर्फे शहरातील रस्ते दुरुस्तीचे कामास सुरुवात
Date : 07 Nov 2025
मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने हॉट मिक्स प्लांटचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे.,यामुळे प्लांटच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली असून, याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत. पावसाळ्यात सुद्धा हॉट मिक्स प्लांट विभागाने शहरातील रस्ते व खड्डे बुजविण्याचे काम यशस्वीपणे केले. जून आणि जुलै महिन्यात एकूण 41 हजार 411 चौरस मीटर क्षेत्राची रस्त्यांची कामे करण्यात आली. याच काळात शहरातील 2114 खड्डे बुजविण्याचे काम हॉट मिक्स प्लांटच्या माध्यमातून करण्यात आले. आता हॉटमिक्स प्लांटचे कार्यकारी अभियंता श्री.अजय डहाके यांच्या मागंरदशनात हिंगणा हॉट मिक्स प्लांटचे उपअभियंता श्री. प्रफुल्ल आसलकर आणि स्थापत्य अभियंता सहायक श्री. विनायक चव्हाण यांच्या मदतीने प्लांटचे संचालन करून करण्यात येत आहे.
मनपाच्या दहाही झोनमध्ये रस्ते दुरुस्तीचे काम करण्याकरिता मनपातर्फे स्मेरा मेहता यांची Arems आणि एस.के. गुरूबक्षांनी या दोन एजन्सी निवड करण्यात आली आहे. याशिवाय मनपातर्फे दोन पथक तयार करण्यात आले आहे. पहिल्या पथकात उपअभियंता श्री. अभिजीत भुरे व कनिष्ठ अभियंता श्री. अंकुश कुवर आणि दुसऱ्या पथकात उपअभियंता श्री. मनोहर राठोड आणि स्थापत्य अभियंता सहायक श्री. शैलेश जांभुळकर यांचा समावेश आहे. पहिले पथक धंतोली, लक्ष्मीनगर, मंगळवारी, हनुमाननगर, नेहरुनगर या झोनमध्ये तर दुसरे पथक गांधीबाग, सतरंजीपुरा आणि लकडगंज या भागाततील रस्त्यावरील खड्डे बुजविणार आहेत. हॉट मिक्स प्लांट विभागातर्फे रामनगर येथील पांढराबोडी आणि रामदासपेठ येथे केयर हॉस्पीटलपासून ते कल्पना बिल्डिंग पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत असल्याची माहिती उपअभियंता श्री. अभिजीत भुरे यांनी दिली.