निवडणूक कामात कसूर करणाऱ्यांवर मनपाची कारवाई
आदेश धुडकावणाऱ्या मुख्याध्यापकावर फौजदारी गुन्हा दाखल
Date : 01 Jan 2026
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मनपाच्या निवडणूक विभागाने २१ डिसेंबर २०२५ रोजी मतदान अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. या अंतर्गत सिव्हील लाईन्स, सदर येथील मुख्याध्यापक श्री. एम. ए. शेख, ईश्वर नगर, रमणा मारोती रोड येथील मुख्याध्यापक श्री. डी.जी. धार्मिक, मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा दाभेकर आणि शांती नगर येथील मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री सलामे यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक विभागाचे कर्मचारी जेव्हा त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर नियुक्तीचा अधिकृत आदेश देण्यासाठी गेले तेव्हा यांनी तो आदेश स्वीकारण्यास नकार दिला.
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. याप्रकरणी मुख्यध्यापकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ (लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनपाच्या स्वच्छता विभागातील निरीक्षकांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून अधिकृतपणे प्राधिकृत करण्यात आले आहे.
निवडणूक हे लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा किंवा अडथळा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संकेत मनपा आयुक्तांनी दिला आहे. यापूर्वीही निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले होते. आता थेट फौजदारी गुन्हा दाखल करून मोठी कारवाई करण्यात येत आहे.