मतदान अधिकार रथ यात्रेने शहरात जनजागृती
स्वीप अंतर्गत शहरातील १० झोनमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Date : 05 Jan 2026
मतदार जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या या मतदार अधिकार यात्रेच्या शुभारंभाला अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त व स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, क्रीडा अधिकारी श्री. पियूष अंबुलकर, स्वीप समन्वयक डॉ. सुशांत चिमणकर उपस्थित होते.
आगामी नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील प्रत्येक झोनमध्ये मतदान अधिकार रथ यात्रा काढण्यात आली व मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच मतदार नोंदणीसाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे या निवडणुकीत बहुसदस्यीय निवडणूक प्रक्रियेत कसे मतदान करावयाचे, याबद्दल मतदारांना माहिती देण्यात आली. हा उपक्रम सर्व झोनमध्ये विविध भागांमध्ये येत्या ११ जानेवारीपर्यंत सतत सुरू राहणार आहे.
यात मतदार अधिकार रथ यात्रेत शहरातील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालय, वसंतराव नाईक शासकीय कला व सामाजिक विज्ञान संस्था तसेच हिस्लॉप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मतदारांमध्ये जनजागृती केली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी वसंतराव नाईक शासकीय कला व सामाजिक विज्ञान संस्थेचे डॉ. अनिल बनकर, अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयाचे डॉ. मनोज मडावी व डॉ. मुरलीधर वाकोडे व हिस्लॉप महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद घाटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जनजागृती केली.
मतदान अधिकार रथ यात्रा प्रत्येक झोनमध्ये विविध भागातून फिरून जनजागृती केली. यासाठी प्रत्येक झोनसाठी एका सन्मवयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात लक्ष्मीनगर झोनसाठी श्रीमती अर्चना लांडे, धरमपेठ झोनसाठी डॉ. अंकित पुसदकर, हनुमाननगर झोनमध्ये मतदान अधिकार रथ यात्रेचे समन्वयक म्हणून श्री. पूर्वेश फटिंग, धंतोली झोन साठी श्री. नितीन कराळे, नेहरूनगर झोनसाठी डॉ. संजय सिंगनजुडे, गांधीबाग झोनमध्ये डॉ. मिलिंद घाटे, सतरंजीपुरा झोनची जबाबदारी डॉ. मनोज मडावी, लकडगंज झोनमधील जबाबदारी डॉ. दिनेश कवाडे, आशीनगर झोनची जबाबदारी डॉ. रजनी हारोडे व मंगळवारी झोनमधील मतदान अधिकार रथ यात्रेच्या समन्वयकाची जबाबदारी डॉ. संध्या फटिंग यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.
मतदार अधिकार यात्रेच्या सुरुवातीच्या अगोदार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या हातात मतदानासाठी जनजागृती करणारे फलक होते. मतदार अधिकार रथाला डिजीटल डिस्प्ले बोर्ड लावले होते. यात मतदानासाठी विविध घोषणा दिल्या जात होत्या. रस्त्याने जाणार्या या मतदार अधिकार रथाकडे मतदारांचे लक्ष वेधून घेतले जात होते.
वाद्यवृंदा कडून देशभक्ती गीतांची धून
मतदार अधिकार रथ यात्रेच्या शुभारंभाच्या वेळी महापालिका शाळांच्या शिक्षकांनी अग्निशमन दलाच्या बँडच्या सहाय्याने देशभक्ती गीतांची धून वाजवून वातावरण देशभक्तीमय केले. या वाद्यवृंदात श्री. प्रकाशचंद कलसिया, श्री. कमलाकर मानमोडे, अग्निशमन दलाची इशिका राऊत व श्री. आकाश श्रीरामे यांचा समावेश होता.