महिला मेळाव्यात दिसतेय पर्यावरण रक्षणासाठी ‘कबाड से जुगाड’ संकल्पना
उद्योजिका महिलांना रोजगाराची संधी : रेशीमबाग मैदानावर महिला उद्योजिका मेळाव्याला नागरिकांची तुफान गर्दी
Date : 02 Feb 2026
नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारा रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये अमरस्वरुप फाऊंडेशन व पुलक मंच परिवार या संस्थांनी ‘निरुपयोगी कबाड पासून तयार केलेल्या वस्तूंना नागरिकांची चांगलीच पसंती मिळत आहे. ‘कबाड से जुगाड’ या संकल्पाने अंतर्गत कापडी पिशवी, फोल्डिंग पिशवी, पाउच, टॉवेल, बॅग आणि लाकडी शोभेच्या वस्तू अशा अनेक पर्यावरणपूरक गोष्टींचा समावेश आहे. या अतिशय कमी किमतीत उपलब्ध असलेल्या वस्तूंना नागपुरकरांची मोठी पसंती मिळत आहे. या मेळाव्यामध्ये अनेक बचत गट तसेच स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांनी आपल्या विभिन्न उत्पादनांचे स्टॉल्स लावले आहेत.
यात विविध महिला बचत गटाचे गृह उद्योग, शेणापासून तयार केलेल्या विविध वस्तू, महिलासाठी शोभेचे दागिने तसेच विविध कपड्याना पसंती मिळत आहे. शिवाय गंगोत्री स्वयंसहायता महिला बचत गट यांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्तू, गोंड पेंटिंग, वारली पेंटिंग, टेराकोटा, होम डेकोरेट इत्यादी वस्तूंना, तर निमिषा बचत गट यांनी तयार केलेल्या फ्लॉवर पॉट, बुके, लाकडी वस्तू नागरिकांना पसंतीस पडत आहे. याशिवाय स्वयंपूर्णा महिला बचत गटातर्फे तयार करण्यात आलेल्या कॅण्डल लाईट डिनर थीम, वाढदिवस व विविध कार्यक्रमात उपयोग केले जाऊ शकणारे वूडन बाऊल कँडल, मेटल जार कँडल, दिवे आर्ट अँड क्राफ्ट डेकोरेशन, मेटल बास्केट इत्यादी वस्तूंना पसंती मिळत आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर मातीची भांडी
शितला माता महिला बचत गट यांच्यातर्फे स्वयंपाकासाठी मातीची भांडी तयार करण्यात आली आहेत. आजच्या धावपळीच्या काळात आरोग्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या उपक्रमामुळे सेंद्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन मिळत असून, महिला मेळाव्यात महिलांच्या कौशल्यालाही व्यासपीठ मिळाले आहे. यशिवाय करंडे, नंदा दीप, कप, बाऊल, अगरबत्ती भरणी, माठ लहान मुलाची खेळणी या वस्तूंना ही मोठी पसंती मिळत आहे.
स्वादिष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी
मुंबईचा वडापाव, साबुदाणा वडा, दाबेली, लिंबू सरबत, खस्ता चाट, पावभाजी, कटोरी चाट, आलू पोंगा, पुरणपोळी, उकडीचा मोदक, मुरमुरा लाडू, कच्चा चिवडा, छोले कुलचे, भेळ, मसाले भात, कोथिंबीर वडी, पापडी चाट, उत्तपम, आप्पे, शेवपुरी आणि स्पेशल भजी यांसारख्या पदार्थांनी महिला उद्योजिका मेळाव्यात मोठी गर्दी खेचली आहे.
याशिवाय, हातावर बनविलेली भाकरी आणि झुणका, भरीत, तसेच बिर्याणी, मटण थाळी, फिश फ्राय आणि चिकन यांसारखे पदार्थ ही विशेष आकर्षण ठरत आहेत. श्री अष्टविनायक महिला बचत गटाने लावलेल्या 'सावजी' स्टॉल्स वर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हरभरा, नाचणी, गहू, ज्वारी आणि बाजरी या मिश्रणापासून बनविलेले पौष्टिक धपाटे अत्यंत माफक दरात या मेळाव्यात उपलब्ध आहेत.गजानन दीव्यांग दिव्यांग पुरुषांचे बचत गटातर्फे तयार करण्यात येत असलेले मोमोज, पोट्याटो टोनाटो, फ्रेंच राईस या यांनाही नागरिकांकडून मागणी होत आहे.