अमरावती रोड अन् हिंगणा रोडवरील संपर्क मजबूत करणारी ‘आपली बस’
Date : 05 Feb 2026
शहरातील वाहतूक अधिक सोपी व्हावी आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे सहज व्हावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेतील वडधामणा (अमरावती रोड) ते वानाडोंगरी (हिंगणा रोड) मार्ग क्रमांक ८७ वर ६ बस सुरू करण्यात आल्या आहेत. ही सेवा २ फेब्रुवारी २०२६ पासून सकाळी ७ वाजता मोरभवन येथील आपली बस टर्मिनल वरून सुरू होणार असून, दिवसभर दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध असतील. या बस संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत धावणार आहेत.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत आणि परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या नेतृत्वात आपली बसच्या सेवा उत्तम रित्या दिली जात आहे. या निर्णयामुळे शहरातील अमरावती रोड आणि हिंगणा रोड या महत्त्वाच्या मार्गांवरील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, वडधामणा (अमरावती रोड) ते वानाडोंगरी (हिंगणा रोड) यांना थेट जोडणारी ही पहिलीच सार्वजनिक बस सेवा आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदार यांची आतापर्यंतची प्रवासाची अडचण दूर होणार आहे.
नवीन वेळापत्रक आणि वाढवलेल्या बस सेवेमुळे दैनंदिन प्रवास अधिक सोयीस्कर होईल, तसेच या मार्गावरील रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि रोजगार केंद्रांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. या उपक्रमातून नागपूर महानगरपालिका आणि आपली बस शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी बस सेवा वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा आपला संकल्प पुन्हा अधोरेखित करत आहे.