नागपूरच्या ५५ व्या महापौर म्हणून भाजपच्या नीता राजेंद्र ठाकरे यांची निवड
उपमहापौरपदी भाजपच्या लीला हाथीबेड शहराच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य – महापौर नीता ठाकरे
Date : 06 Feb 2026
नागपूर शहराच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली विशेष सभा आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. सभेत पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. गणेश राठोड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पीठासीन अधिकारी यांनी पहिल्यांदा महापौर पदासाठी निवडणूक जाहीर केली. यापदासाठी भाजपाकडून श्रीमती नीता ठाकरे तर काँग्रेसकडून श्रीमती स्नेहल ठाकरे यांचे उमेदवारी अर्ज आल्याचे निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी जाहीर केले. कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी हात उंच करून मतदानाची प्रक्रिया पार पाडली. यात भाजपच्या श्रीमती नीता ठाकरे यांना १०४ मते मिळाली तर पराभूत उमेदवार श्रीमती स्नेहल ठाकरे यांना ३६ मते मिळाली. या निवडणुकीत ११ सदस्यांनी कोणत्याही उमेदवाराला मत न दिल्याने त्यांच्या मतांची गणना तटस्थ म्हणून करण्यात आली. पीठासीन अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी महापौर म्हणून श्रीमती नीता ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली.
यानंतर उपमहापौरपदासाठी भाजपकडून श्रीमती लीला अजय हाथीबेड तर काँग्रेसकडून श्री. विवेक रमेश निकासे यांच्या उमेदवारीची घोषणा निगम सचिवांनी केली. या उमेदवारांपैकी एकानेही अर्ज मागे न घेतल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी हात उंच करून मतदानाची प्रक्रिया पार पाडली. यात भाजपच्या उमेदवार श्रीमती लीला हाथीबेड यांना १०४ तर काँग्रेसचे उमेदवार श्री. विवेक निकोसे यांनी ३६ मते मिळाली. या निवडणुकीतही सभागृहातील ११ सदस्यांनी कोणत्याही उमेदवाराला मत न दिल्याने त्यांच्या मतांची गणना तटस्थ म्हणून करण्यात आली. पीठासीन अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपमहापौर म्हणून श्रीमती लीला हाथीबेड यांच्या नावाची घोषणा केली. सभागृहाची सुरूवात वंदेमातरम् ने करण्यात आली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पीठासीन अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत व श्रीमती वैष्णवी बी. यांनी नवनिर्वाचित महापौर श्रीमती नीता ठाकरे व उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या स्मृतीला नमन करून महापौरपदाचा कार्यभार सांभाळून सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करीत सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले.
सर्वांगिण विकासाला प्राधान्य- महापौर नीता ठाकरे
नागपूर शहराच्या सर्वांगिण विकास करण्यावर आपला भर राहणार असल्याचे नवनिर्वाचित महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी पदभार सांभाळल्यानंतर सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विकासाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सर्व नगरसेवकांच्या सहाय्याने शहराचा विकास करण्याचा माझा संकल्प असल्याचे सांगितले. तसेच महिलांसाठी योजना, पर्यावरण, शिक्षण व शहराच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नागरी सुविधांवर भर – उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड
उपमहापौरपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर शहराच्या नागरी सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, नवनिर्वाचित उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड यांनी सांगितले.
सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्षनेता
महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी पदभार सांभाळल्यानंतर सभागृहाचे सत्तारुढ पक्षनेते म्हणून भाजपचे नगरसेवक श्री. नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांची घोषणा केली. त्याचप्रमाणे सभागृहाचे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे नगरसेवक श्री. संजय महाकाळकर यांच्या नावाची घोषणा केली.